अनधिकृत कसोटी : भारत अ चे जोरदार प्रत्युत्तर, दिवसअखेर 1 बाद 116 धावा
वृत्तसंस्था/ लखनौ
नारायण जगदीशनच्या अर्धशतकाच्या बळावर भारत अ संघाने ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध सुरू असलेल्या अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पावसामुळे खेळ थांबवण्याआधी 1 बाद 116 असे जोरदार प्रत्युत्तर दिले. ऑस्ट्रेलिया अ ने पहिला डाव 6 बाद 532 धावांवर घोषित केला. त्यांच्या डावात जोश फिलिपने 87 चेंडूत नाबाद 123 धावांची खेळी केली.
पावसामुळे खेळ थांबविण्यात आला त्यावेळी जगदीशन 95 चेंडूत 50 व बी. साई सुदर्शन 20 धावांवर खेळत होते. जगदीशनने आपल्या खेळीत 5 चौकार व एक षटकार मारला. भारत अ अद्याप 416 धावांनी पिछाडीवर आहे. अभिमन्यू ईश्वरनने जगदीशनसमवेत 88 धावांची सलामी दिल्यानंतर जगदीशन व साई सुदर्शन यांनी डाव सांभाळला. ईश्वरनने 58 चेंडूत 44 धावा धावा जमविल्या. त्यात 6 चौकारांचा समावेश होता. 22 व्या षटकात त्याला लियाम स्कॉटने त्रिफळाचीत केले. पावसाच्या व्यत्ययामुळे दुसऱ्या दिवशी केवळ 55 षटकांचा खेळ होऊ शकला.
त्याआधी ऑस्ट्रेलिया अ चा यष्टिरक्षक फलंदाज जोश फिलिपने व नंतर इतर फलंदाजांनीही भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. फिलिपने जोरदार फटकेबाजी करी नाबाद 123 धावा केवळ 87 चेंडूत तडकावल्या. त्याला 4 षटकार व 18 चौकारांचा समावेश होता. झेवियर बार्टलेटने 39 चेंडूत नाबाद 24 धावा जमविल्या. फिलिपने स्कॉटसमवेत सहाव्या गड्यासाठी 81 तर बार्टलेटसमवेत 62 चेंडूत सातव्या गड्यासाठी 118 धावांची भागीदारी केली. स्कॉट 81 धावांवर बाद झाला. त्यात 8 चौकार, 2 षटकारांचा समावेश होता. दुबेने 3 तर गुरनूर ब्रारने 2 बळी मिळविले. प्रसिद्ध कृष्णाला बळी मिळविता आला नाही.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया अ प.डाव 98 षटकांत 6 बाद 532 डाव घोषित : कोन्स्टास 109, कॅम्पबेल केलावे 88, कूपर कोनोली 70, स्कॉट 88, फिलिप नाबाद 123, दुबे 3-141, ब्रार 2-87, भारत अ प.डाव 30 षटकांत 1 बाद 116 : ईश्वरन 44, जगदीशन नाबाद 50, लियाम स्कॉट 1-9.









