वृत्तसंस्था/ ढाका
फिल सिमॉन्स हेच बांगलादेशचे मुख्य प्रशिक्षक म्हणून 2027 मधील वनडे वर्ल्ड कपपर्यंत काम पाहणार आहेत. सिमॉन्स यांची अलीकडेच झालेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेपर्यंत हंगामी प्रशिक्षक म्हणून बांगलादेश क्रिकेट मंडळाने नियुक्ती केली होती. पण आता त्यांना दोन वर्षांची मुदतवाढ मिळाली असल्याने ते बांगलादेश संघासमवेत यापुढेही कार्यरत राहतील. ‘दीर्घ काळासाठी माझी बांगलादेश क्रिकेटसाठी काम करण्याची मला संधी देण्यात आली, याचा मला आनंद आहे. या संघात प्रचंड प्रतिभा असलेले खेळाडू आहे. त्यांच्यासमवेत पुढील प्रवास मी उत्सुक झालोय,’ असे सिमॉन्स नियुक्ती झाल्यानंतर म्हणाले.
हंगामी प्रशिक्षकपदी असताना सिमॉन्स यांना फारसे यश मिळाले नाही. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बांगलादेशने एक कसोटी आणि विंडीजमध्ये एक टी-20 मालिका जिंकली. अलीकडेच झालेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत बांगलादेशला एकही सामना जिंकता आला नाही आणि त्यांचे आव्हान साखळी फेरीतच समाप्त झाले. भारत व न्यूझीलंडकडून त्यांना पराभूत व्हावे लागले. सिमॉन्स यांना मुदतवाढ मिळाल्याने ते आता पाकमध्ये होणाऱ्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये कराची किंग्स संघाचे प्रशिक्षकपद सांभाळू शकणार नाहीत. त्यांनी याआधी झिम्बाब्वे, आयर्लंड, अफगाणिस्तान या संघांचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. विंडीज मॅनेजमेंटमध्ये ते असताना विंडीजने 2016 मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता.









