विविध स्पर्धांमध्ये मिळविले घवघवीत यश
बेळगाव : येथील बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या (बिम्स) पहिल्या पीजी बॅचमधील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. या पार्श्वभूमीवर बिम्सचे संचालक अशोककुमार शेट्टी व प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक करून गौरव करण्यात आला. नवजात शिशु सप्ताहानिमित्त जेएनएमसी बेळगाव महाविद्यालयामध्ये राष्ट्र पातळीवरील नवजात शिशु प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये बिम्सच्या पिडीअॅट्रिक विभागातील विद्यार्थिनी डॉ. राधिका आणि डॉ. वैष्णवी यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. पॅथॉलॉजीत डॉ. पूजा एस. यांच्यासह सायटोलॉजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी दुसरा क्रमांक पटकविला. इंडियन असोसिएशन ऑफ सायटोलॉजीस्टतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ऑर्थोपेडिक विभागातील डॉ. रक्षित ए. सी. यांनी भाजल्यानंतर विद्रुपतेवर उपचार या संदर्भात करण्यात आलेल्या प्रबंधाला पुरस्कार मिळविला आहे. डॉ. मंजुनाथ डिगै यांनी संधिवातावर सादर केलेल्या प्रबंधाला पुरस्कार मिळविला आहे. कलबुर्गी येथे झालेल्या स्पर्धांमध्ये डॉ. अनिल एस., डॉ. प्रणव बात्रा, डॉ. अफिल जॅकोब यांनी प्रश्नमंजुषा व सादर केलेल्या प्रबंधांना पुरस्कार मिळाला. विजापूर येथे झालेल्या 33 व्या कसोगा राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये डॉ. सहना नायक, डॉ. वैष्णवी के. एस. यांनी प्रथम क्रमांक पटकविला. अशाप्रकारे विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा बिम्सतर्फे गौरव करण्यात आला. यावेळी विविध विभागांचे प्रमुख व प्राचार्य उपस्थित होते.









