के.जे.हळ्ळी-डी.जे.हळ्ळी हिंसाचार प्रकरणी कारवाई : दहशतवाद्यांकडून घेतले प्रशिक्षण
प्रतिनिधी/ कारवार
बेंगळूरच्या के.जे.हळ्ळी आणि डी. जे. हळ्ळी येथील दंगली प्रकरणातील मोस्ट वाँटेड आरोपीला कारवार जिल्हा पोलिसांनी अटक केली आहे. शिरसीच्या टिपूनगर येथील रहिवासी मोहसीन उर्फ इम्तियाज शुकूर याला विजापूर जिल्ह्याच्या सिंदगी येथे अटक करण्यात आली.
तो प्रतिबंधीत पीएफआय संघटनेचा कार्यकर्ता असून दहशतवाद्यांकडून प्रशिक्षण घेतले होते. के.जे.हळ्ळी-डी.जे.हळ्ळी येथील हिंसाचाराच्या घटनेनंतर तो फरार झाला होता. त्याच्या अटकेसाठी कारवार जिल्हा पोलीस प्रमुख एम. नारायण यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके नेमण्यात आली होती. यापूर्वी दहशतवादी कृत्यांशी संबंधीत शिरसी येथे एनआयए सादीक याला अटक करण्यात आली होती. त्याला मोहसीनने प्रशिक्षण दिले होते. मोहसीन विरोधात यापूर्वी अनेक गुन्हे नोंद आहेत. तो हैदराबादमार्गे सिंदगीमध्ये येवून वास्तव्यास आला होता. ही माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. 2020 मध्ये बेंगळूरच्या के.जे.हळ्ळी-डी.जे.हळ्ळी येथे दंगल उसळली होती. पूलकेशीनगरचे आमदार अखंड श्रीनिवासमूर्ती व काही जणांची घरे पेटविण्यात आली होती. समाजकंटकांनी डी.जे.हळ्ळी पोलीस स्थानकही पेटविले होते.जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला होता.









