संघ, भाजप नेते आणि सरकारी अधिकारी ‘लक्ष्य’
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या गुरुवारी केंद्र सरकारच्या एनआयए आणि ईडी यांनी संयुक्तरित्या घातलेल्या देशव्यापी धाडींनंतर पीएफआय बिथरली असून या संघटनेने सूडाची भाषा सुरु केली आहे. हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपच्या नेत्यांना लक्ष्य केले जाण्याची योजना आखण्यात आली आहे, अशी गुप्तचरांची माहिती आहे.
समाजात द्वेषभावना निर्माण करणे आणि दोन धर्मांमध्ये फूट पाडणे, तसेच देशात इस्लामी उन्माद निर्माण करणे या तीन उद्देशांसाठी ही संघटना कार्य करीत आहे, असा एनआयएचा आरोप आहे. देशव्यापी धाडसत्रामुळे या संघटनेची पिछेहाट झाली असून त्यामुळे संघटनेचे हस्तक संतप्त झाल्याचे बोलले जाते. संघटनेच्या अनेक महत्वाच्या नेत्यांना अटक झाल्याने संघटनेच्या दैनंदिन कामांवर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येते. भारताचे इस्लामीकरण करणे हे संघटनेचे दीर्घकालीन ध्येय असल्याचा आरोप होत आहे. याच संदर्भात आता या संघटनेची कसून चौकशी केली जात आहे. यामुळे बिथरलेल्या या संघटनेने थयथयाट सुरु केला असून महत्वाच्या सरकारी अधिकाऱयांनाही लक्ष्य बनविण्यात येत आहे.
शांतता बिघडविण्यास सज्ज
देशभरातील शांतता आणि विविध धर्मांमधील सौहार्द बिघडविण्याच्या दृष्टीने या संघटनेचे भूमिगत नेते कुटील कारस्थाने करीत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते, भाजपचे पदाधिकारी आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांची कार्यालये, तसेच इतर आस्थापनांवर हल्ले करण्याचा तिचा बेत आहे. याची माहिती आधीच समजल्याने केंद्र सरकारनेही जय्यत तयारी ठेवली असून हिंसाचार उसळविण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडा अशी सूचना देशातील पोलीस अधिकाऱयांना देण्यात आली आहे.
अनेक नेत्यांना अटक
ई. अबूबकर, ई. एम. अब्दुर रहमान, कलीम कोया आदी ज्येष्ठ नेते अटकेत असल्याने संघटनेचे इतर हस्तक धास्तावले आहेत. त्यामुळे त्यांनी प्रतिहल्ला करण्याची तयारी चालविल्याचे गुप्तचरांचे म्हणणे आहे. यासाठी विशेष प्रकारे प्रक्षिण देण्यात आलेल्या मारेकऱयांची नियुक्ती होणार आहे. नेत्यांना पुढचा काही काळ सुरक्षा शिष्टाचारांचे पालन करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यांनी सुरक्षेचे नियम मोडून लोकांच्यात मिसळू नये तसेच अनोळखी स्थानी सुरक्षा सैनिक असल्याखरीज जाऊ नये असेही स्पष्ट करण्यात आले आहे. आगामी काळात पुन्हा पीएफआयच्या हस्तकांची धरपकड करण्यात येईल, अशी शक्यता आहे.









