इंधनसह इलेक्ट्रिक वाहनांना होणार फायदा, सरकारचा योजनेला हिरवा कंदील
बेळगाव : तेलंगणाच्या धर्तीवर हिंडलगा मध्यवर्ती कारागृहासह राज्यातील 5 प्रमुख मध्यवर्ती कारागृहांच्या आवारात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन व पेट्रोल पंप सुरू केला जाणार आहे. या योजनेला राज्य सरकारने हिरवा कंदील दर्शविला असून पहिल्या टप्प्यात बेंगळूर येथील परप्पन अग्रहार कारागृहात प्रायोगिक तत्त्वावर चार्जिंग स्टेशन आणि पेट्रोल पंप सुरू केला जाणार आहे. कारागृहांच्या आवारात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन व पेट्रोल पंप सुरू करण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून सरकारसमोर प्रलंबित होता. या प्रस्तावाला अखेर कारागृह आणि राज्य सरकारने हिरवा कंदील दर्शविला आहे. या माध्यमातून कारागृह प्रशासनाला आर्थिक उत्पन्न मिळण्यासह कैद्यांच्या हातांना काम मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात बेंगळूर येथील परप्पन अग्रहार कारागृहाच्या आवारात चार्जिंग स्टेशन सुरू केले जाणार आहे. ही योजना एचपीएल कंपनीच्या सहभागात सुरू केली जाणार असून यानंतर हिंडलगासह राज्यातील अन्य चार कारागृह आवारातही इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन व पेट्रोल पंप सुरू केले जाणार आहेत.
कैद्यांच्या स्वावलंबनासाठी विविध उपक्रम हाती
यापूर्वी कैद्यांना कारागृह प्रशासनातर्फे जेवण, बेकरी व्यवसाय, स्टेशन साहित्य तयार करणे, टेलरिंग व्यवसायाबरोबरच भाजी विक्री आदी व्यवसायाच्या माध्यमातून स्वयंउद्योग करण्यासाठी प्रेरित केले जात होते. कारागृहातून सजा संपवून बाहेर पडल्यानंतर कैदी स्वत:चा व्यवसाय सुरू करून आपल्या पायावर उभे रहावेत या उद्देशाने सरकारने कैद्यांच्या स्वावलंबनासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यानंतर आता कारागृह प्रशासनाला आर्थिक उत्पन्न मिळावे व कैद्यांच्या हातांना काम मिळावे यासाठी राज्यातील पाच प्रमुख पाच मध्यवर्ती कारागृहांच्या आवारात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन सुरू केले जाणार आहेत. अशा प्रकारचा प्रयोग तेलंगणा राज्यात यशस्वी झाला असून, याच धर्तीवर कर्नाटकातही हा प्रयोग राबविला जाणार आहे.
सर्व कामकाज कैदीच हाताळणार
राज्यातील बेंगळूर, म्हैसूर, बेळगाव, गुलबर्गा आणि विजापूर येथील पाच मध्यवर्ती कारागृहात चार्जिंग स्टेशन व पेट्रोल पंप उभारले जाणार आहेत. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून लवकरच कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या चार्जिंग स्टेशन व पेट्रोल पंपचे मुख्य वैशिष्ट्या म्हणजे येथील सर्व कामकाज कैदीच हाताळणार आहेत. कारागृह आवारातील खाली जागांचा वापर यासाठी उपयोग केला जाणार असून लवकरच टप्प्याटप्प्याने बेंगळूरनंतर हिंडलगासह इतर कारागृहात चार्जिंग स्टेशन व पेट्रोल पंप उभारण्याचे काम सुरू होणार आहे.









