जनतेवर महागाईचा असह्य मारा
वृत्तसंस्था/ कोलंबो
श्रीलंकेतील आर्थिक संकट तीव्र होत चालल्याने सर्वसामान्य लोकांच्या अडचणी वाढत आहेत. सरकारकडील विदेशी चलनाचा साठा संपुष्टात आल्याने महागाई वाढतेय. तर महागाईचा मार झेलणाऱया जनतेला सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ करत अधिकच मोठा झटका दिला आहे. श्रीलंकेतील वर्तमान आर्थिक संकट लवकर संपण्याची चिन्हे नसल्याने जनतेच्या अडचणी वाढणार आहेत.
पेट्रोलच्या किमतीमध्ये 20-24 टक्क्यांची वाढ होईल. तर डिझेलच्या किमतीत तत्काळ प्रभावाने 35-38 टक्क्यांची वृद्धी होणार आहे. मंत्रिमंडळाने अशाचप्रकारे परिवहन आणि अन्य सेवाशुल्कांमध्ये वाढ करण्यास मंजुरी दिल्याची माहिती वीज अन् ऊर्जामत्री कंचना विजेसेकेरा यांनी ट्विट करत दिली आहे. इंधनाचा वापर कमीत कमी करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. श्रीलंकेत सध्या पेट्रोल 420 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 400 रुपये प्रतिलिटर या दराने विकले जात आहे.
सरकारकडे सामग्री आयात करण्यासाठी विदेशी चलन नसल्याने देशात पेट्रोल, गॅस आणि औषधांची मोठी टंचाई दिसून येत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकार अनेक मार्ग शोधत आहे. श्रीलंकेत महागाई दर मार्चमध्ये 21.5 टक्क्यांच्या तुलनेत एप्रिलमध्ये वाढून 33.8 टक्के झाला आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत पेट्रोलच्या दरात 259 टक्के तर डिझेलच्या दरात 231 टक्क्यांची भर पडली आहे. देशात सातत्याने वाढणाऱया महागाईचा सर्वात मोठा फटका गरीबांना बसला आहे.









