पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास : आंतरराष्ट्रीय भारत ऊर्जा परिषद गोव्यात सुरू,120 देशांतील 35 हजार प्रतिनिधींचा सहभाग
काणकोण : आपल्या देशाने मागच्या आठ-नऊ वर्षांत खूप प्रगती केली असून अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारत विश्वात आज अव्वल देशांपैकी एक बनला आहे. आव्हानांना तोंड देण्याच्या दृष्टीने पर्याय देण्यात उल्लेखनीय यश भारताने मिळविले आहे. देशांतर्गत कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्खनन व उत्पादन वाढविण्याबरोबर आयात कमी करण्यासाठी आणि इंधनाचे दर नियंत्रणात राखण्यासाठी पेट्रोलियम पदार्थांमध्ये इथेनॉलचे मिश्रण वेगाने वाढत आहे. अशा वैविध्यपूर्ण उपाययोजनांतून ऊर्जा क्षेत्रात येणाऱ्या आव्हानांना सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पुढील पाच वर्षांत पेट्रोल व डिझेलचे दर कमी होणार आहेत, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेतूल-केपे (गोवा) येथे बोलताना काढले. भारत ऊर्जा सप्ताह, 2024 च्या अंतर्गत भारतीय पेट्रोलियम उद्योग समूहाने काल मंगळवारी बेतूल येथील ओएनजीसी प्रकल्पात आयोजित केलेले ऊर्जा प्रदर्शन आणि परिषदेचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यपाल पी. एस. पिल्लई, केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीपसिंह पुरी त्याचप्रमाणे श्रम आणि रोजगारमंत्री भूपेंद्र यादव उपस्थित होते.
उत्स्फूर्त प्रतिसाद, 120 देशांचा सहभाग
या सप्ताहानिमित्त आयोजित उपक्रमात 120 देशांतील 35 हजारांपेक्षा अधिक प्रतिनिधी, 350 पेक्षा अधिक प्रदर्शनात सहभागी झालेल्या कंपन्या, तसेच 400 पेक्षा अधिक निमंत्रितांचा सहभाग आहे. भव्य अशा या प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी अशा प्रकारच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. गोवा हे आतिथ्यशील असे राज्य असून निसर्गसौंदर्याने नटलेला हा प्रदेश पर्यावरणाबद्दल प्रसिद्ध आहे. पर्यटकांसाठी हे आकर्षणस्थळ आहे. अशा प्रदेशात हे प्रदर्शन भरले आहे. त्यामुळे त्याचे निश्चितच चांगले फलित मिळेल, असे ते म्हणाले.
पाच वर्षांत पेट्रोल, डिझेलचे दर कमी होणार
21 व्या शतकात साधनसुविधा बळकट करण्यासाठी ऊर्जाशक्ती वाढविण्याची गरज असून पुढील पाच वर्षांत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याकडे आपले सरकार लक्ष देणार आहे. या क्षेत्रात आपला देश जगात प्रथम क्रमांकावर येणार आहे. सध्या आपला देश सर्व क्षेत्रांत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बाबतीत देखील भारताने खूप प्रगती केलेली असून पर्यावरणाच्या आधारे ऊर्जाशक्ती वाढवितानाच सौर ऊर्जेवर भर देण्यात येणार आहे, असे पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले.
ऊर्जा क्षेत्रात भारताला भक्कम स्थान : पुरी
शाश्वत ऊर्जाशक्ती वाढवितानाच केवळ दोन वर्षांच्या कालावधीत जागतिक ऊर्जा उपक्रमांत आपला देश एक प्रमुख घटक बनला आहे. प्रमुख अर्थव्यवस्था, वाढता ग्राहक आधार आणि गुंतवणुकीला अनुकूल वातावरण यांच्या जोरावर आपल्या देशाने जागतिक ऊर्जाक्षेत्रात भक्कम स्थान प्राप्त केले आहे, असे यावेळी केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीपसिंह पुरी यांनी आपल्या स्वागतपर भाषणात स्पष्ट केले. या उपक्रमासाठी केंद्रातील नोडल मंत्रालय आणि गोव्याच्या प्रशासनासह विविध सरकारी विभागांनी सहकार्य केलेले असून अशा प्रकारचा ऊर्जाशक्ती महोत्सव निश्चितच गोव्याला प्रेरणादायी ठरेल, असे मत मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केले. भारत ऊर्जा सप्ताहात ऊर्जा उत्पादक राष्ट्रांच्या प्रमुख उत्पादक संस्था सहभागी झालेल्या असून त्यात भारतासहित विविध देशांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. या सप्ताहात ऊर्जा उत्पादक देशांचे ऊर्जामंत्री, तेल आणि वायू उद्योगातील धोरणकर्ते आपली मते सादर करणार आहेत. हे व्यासपीठ अनुभवाची देवाणघेवाण करत तसेच धोरणात्मक सहकार्य व संबंध वाढीसाठी पूरक वातावरण उपलब्ध करत संपूर्ण जगाला स्वच्छ आणि सुरक्षित ऊर्जा भविष्यासाठी साद घालणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
विविध चर्चासत्रांचा समावेश
यात सहभागी झालेल्या विदेशी शासकीय प्रतिनिधींमध्ये लीबिया, नायजेरिया, सुदान या देशांचे पेट्रोलियम मंत्री, घाना, जिबुली व श्रीलंका देशांचे ऊर्जामंत्री यांचा समावेश आहे. ‘आयईडब्ल्यू’मध्ये अनेक अधिकारी, नियामक संस्था, नूतनीकरण योग्य आणि पर्यायी ऊर्जा संघटना व कंपन्या, धोरण संशोधक व धोरण सल्लागार सहभागी झाले आहेत. आजपासून 9 फेबुवारीपर्यंत चालणाऱ्या या ऊर्जा परिषदेत विविध सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. 8 रोजी ‘भारताची 2023 मधील इंधन बाजारपेठ आणि भविष्यातील ऊर्जापुरवठा साखळी’ आणि ‘सध्याच्या इंधन मिश्रण धोरणा’चा प्रभाव ही चर्चासत्रे होणार आहेत. 9 रोजी ‘भूस्तरीय बदल : खोल पाण्यातील क्षेत्राच्या सीमा विकसित करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा शोध आणि अवलंब’ आणि ‘व्हीयूसीए जगामध्ये राष्ट्रासाठी तसेच उद्योगांसाठी ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करणे’ या विषयावर चर्चासत्रे होणार आहेत. या सप्ताहानिमित्त जागतिक ऊर्जा परिसंस्था, उत्पादने यावर खास प्रदर्शन भरविण्यात आले आहे.