लाहोर / वृत्तसंस्था
विविध आर्थिक संकटांशी सामना करणाऱया पाकिस्तानात इंधन दरांचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेल किमान 30 रुपयांनी महाग करण्यात आल्याने देशात महागाई वाढण्याचे संकेत मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) कर्ज देण्याच्या पार्श्वभूमीवर इंधन आणि विजेचे दर वाढविण्यासाठी दबाव टाकल्याने गुरुवारी रात्री उशिरा शाहबाज सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 30 रुपयांची वाढ करून देशाला मोठा धक्का दिला.
पाकिस्तानसमोर सध्या दुहेरी समस्या निर्माण झाली आहे. सात दिवसांच्या चर्चेनंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला 6 अब्ज डॉलरचे कर्ज देण्यास सहमती दर्शवली. यानंतर सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 30 रुपयांनी (पाकिस्तानी चलनात) वाढ केली. सरकारकडे इंधनाचे दर वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आम्ही अजूनही प्रतिलिटर 56 रुपये अनुदान देत आहोत, असे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांनी स्पष्ट केले.
एकीकडे कर्ज मिळविण्यासाठी नव्या सरकारची धडपड सुरू असतानाच माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी शाहबाज शरीफ सरकारला 6 दिवसांत निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याची मुदत दिली आहे. हे अयशस्वी झाल्यास इस्लामाबाद आणि देशभरात मोर्चे आणि धरणे काढू, अशी धमकी त्यांनी दिली आहे. यामध्ये हिंसाचार झाला तर त्याला सरकार जबाबदार असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.









