पेट्रोल 10 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 8 रुपयांचा फरक : सीमेलगतच्या पेट्रोलपंपांवर वाहनधारकांची गर्दी
प्रतिनिधी /बेळगाव
केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे इंधनाचे दर कमी झाले. परंतु प्रत्येक राज्य सरकारकडून आकारला जाणारा कर हा कमी-जास्त असल्यामुळे इंधनाच्या दरातही तफावत आहे. महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकात 10 रुपयांनी पेट्रोल तर डिझेलच्या दरात 8 रुपयांचा फरक आहे. यामुळे सीमाभागातील पेट्रोलपंपांवर वाहनचालकांची गर्दी होताना दिसत आहे. बेळगाव जिल्हय़ातील पेट्रोलपंप चालकांना फायदा होत असला तरी कोल्हापूरमधील इंधन विक्री कमी होताना दिसत आहे.
महागाईने उच्चांक गाठला असल्याने केंद्र सरकारने दिलासा देण्याचा प्रयत्न केला. रविवारी पेट्रोलचे दर 9.50 रुपये तर डिझेल 7 रुपयाने स्वस्त करण्यात आले. पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यात आल्याने वाहनचालकांमधून समाधान व्यक्त होत होते. इतर राज्यांमध्ये 105 रुपयांहून अधिक पेट्रोलचा दर असताना कर्नाटकात मात्र 101 रुपये असल्याने इतर राज्यांमधील वाहने येथे येत आहेत. महाराष्ट्रातून प्रवेश करताच बेळगाव जिल्हय़ातील पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगाच रांगा लागत आहेत. एका बाजूला उचगाव दुसऱया बाजूला निपाणी, संकेश्वर बेळगाव या परिसरातील पेट्रोल पंपांवर गर्दी होत आहे.
पेट्रोलपंपांवर जाहिरातीचे फलक
राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्राच्या सीमेपासून सर्वच पेट्रोलपंपांनी जाहिराती लावल्या आहेत. महाराष्ट्र गुजरातपेक्षाही स्वस्त दराने पेट्रोल व डिझेल असे फलक उभारून ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्याचे प्रयत्न पंपांवर होत आहे. मराठी, इंग्रजी, गुजराथी, तामिळ या भाषांमध्ये ठिकठिकाणी फलक उभारले आहेत. यामुळे पेट्रोलच्या विक्रीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याचे पंपचालक सांगत आहेत.
विक्रीत मोठय़ा प्रमाणात वाढ
महाराष्ट्र, गुजरात पेक्षाही कर्नाटकात पेट्रोल व डिझेल स्वस्त असल्याने विक्री मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. उत्तर भारतातून दक्षिणेकडे जाणाऱया, दक्षिण भारतातून उत्तर भारतात जाणारी मालवाहू वाहने पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी बेळगावमध्ये थांबत आहेत. येत्या काही दिवसात राज्य सरकारकडून आनखी दर कमी होण्याची शक्मयता असल्याने अजून विक्रीत वाढ होईल, असा अंदाज प्रशांत मेलगे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केला.
– प्रशांत मेलगे (पेट्रोलपंप चालक असोसिएशनचे सदस्य)
दरफलक…
| शहर | पेट्रोल दर (रु.) | डिझेलचा दर (रु.) |
| बेळगाव | 101.69 | 87.69 |
| पणजी | 97.68 | 90.23 |
| कोल्हापूर | 111.44 | 95.94 |









