२० हजार मानधन आम्हाला कधी मिळणार ? सेवानिवृत्त शिक्षकांची शिक्षण विभागाकडे विनवणी
सावंतवाडी प्रतिनिधी
राज्याच्या शिक्षण विभागाने प्राथमिक शाळेत शिक्षकांची अपुरी संख्या पाहता सेवानिवृत्त शिक्षकांना वीस हजार मानधन तत्वावर भरती करण्याची प्रक्रिया हाती घेतली होती. आणि तसा अध्यादेश गेल्या जुलै महिन्यात काढला. या निर्णयाविरोधात सर्वत्र वादळे निर्माण झाली . सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा सेवेत का आणि तरुण बेरोजगार डीएड धारकांना स्थान द्या अशी मागणी जोर धरत होती . पण राज्य सरकार आपल्या निर्णयाशी ठाम राहिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास 57 सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक सेवेत रुजू झाले. तीन महिने होत आले तरी त्यांचे वीस हजाराचे मानधन अद्यापही देण्यात आलेले नाही. त्यामुळे गेले तीन महिने एक रुपयाही न घेता त्यांचे सेवा दान सुरू आहे. शिक्षण विभागाला संपर्क साधला असता त्यांनी तुम्ही पेन्शन घेता मग तुम्हाला पगार कशाला हवा अशी उत्तरे आता दिली जात आहेत. त्यामुळे वयोवृद्ध सेवानिवृत्त शिक्षकांच्या पदरी अशी निराशा आली आहे. एकीकडे शासनाच्या हाकेला सेवानिवृत्त शिक्षक पुढे आले आणि दुसरीकडे ते रुजू झाल्यानंतर त्यांना आता कोणत्या सुविधा दिल्या जात नाहीत. त्यामुळे अजब तुझे हे सरकार अशी म्हणण्याची वेळ आता या सेवानिवृत्त शिक्षकांवर आली आहे. एकीकडे आता कामावर यायचे बंद करायचे तर विद्यार्थ्यांचे नुकसान होते. आणि त्याचबरोबर शासनाने त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्रही घेतले आहे. जोपर्यंत नवीन शिक्षक भरती होत नाही तोपर्यंत या शिक्षकांना तेथे काम करावे लागणार आहे. त्यामुळे या सेवानिवृत्त शिक्षकांची दोन्ही बाजूने कोंडी झाली आहे . राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी हा अजब असा फतवा काढला . आणि आता त्या सेवानिवृत्त शिक्षकांना मानधन देण्यासाठी जर निधीच नसेल तर त्यांना कशाला सेवेत घेतले आणि जर तुम्ही तसा मानधन देण्याचा शब्द दिला होता तर तशी तरतूद का केली गेली नाही असा सवाल आता हे सेवानिवृत्त शिक्षक विचारत आहेत.









