वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या गुरुपतवंतसिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप असणाऱ्या निखिल गुप्ता याच्या कुटुंबियांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे. गुप्ता हा सध्या झेकोस्लोव्हाकिया देशाच्या कारागृहात आहे. त्याची सुटका करण्यासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा, असा आदेश देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. गुप्ता याला झेकोस्लोव्हाकिया सरकारने बेकायदेशीररित्या अटक केली आहे, असा आरोपही याचिकेत आहे.
ही याचिका शुक्रवारी प्राथमिक सुनावणीसाठी आली होती. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने कोणताही आदेश दिला नाही. सुनावणी 4 जानेवारीला होण्याची शक्यता आहे. शनिवारपासून सर्वोच्च न्यायालयाच्या हिवाळी सुटीचा प्रारंभ होत आहे. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली, अशी माहिती देण्यात आली.
निखिल गुप्ता याला ऑगस्ट 2023 मध्ये झेकोस्लोव्हाकियामध्ये अमेरिकेच्या विनंतीवरुन अटक करण्यात आली होती. पन्नू याची हत्या भाडोत्री मारेकऱ्याकडून करण्याचा कट त्याने केला असा आरोप आहे. अमेरिकेने गुप्ता याचे अमेरिकेला प्रत्यार्पण करण्याची विनंतीही झेकोस्लोव्हाकियाला केली आहे. झेकोस्लोव्हाकियाची राजधानी प्रागच्या स्थानिक प्रशासनाने त्याचे प्रत्यार्पण अमेरिकेला करण्यायोग्य परिस्थिती आहे, अशी सूचना केली आहे. तथापि, या सूचनेला अद्याप झेक सरकारची मान्यता मिळालेली नाही, अशी या प्रकरणाची पार्श्वभूमी आहे.
गोमांस खायला लावले…
निखिल गुप्ता हा हिंदू असल्याने गोमांसभक्षण करीत नाही. तथापि, झेक कारागृहात त्याला गोमांस खावयास देण्यात आले. त्याने तक्रार करुनही दखल घेण्यात आली नाही. कारागृहात त्याच्यावर अन्याय होत आहे, असे अनेक आरोप त्याच्या कुटुंबियांनी सादर केलेल्या याचिकेत करण्यात आले आहेत.









