सर्वोच्च न्यायालय सुनावणीसाठी तयार : येमेनमध्ये 16 जुलैला शिक्षा दिली जाणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
येमेनमध्ये फाशीची शिक्षा झालेल्या केरळमधील परिचारिका निमिषा प्रिया हिच्याशी संबंधित याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सहमती दर्शवली. याचिकेत केंद्र सरकारला राजनैतिक हस्तक्षेप करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांचे खंडपीठ आता 14 जुलै रोजी या खटल्याची सुनावणी करणार आहे. येमेनी नागरिकाच्या हत्येप्रकरणी निमिषाला 16 जुलै रोजी फाशी देण्यात येणार आहे. गेल्यावर्षी येमेनीचे राष्ट्रपती रशाद अल-अलीमी यांनी तिच्या मृत्युदंडाला मान्यता दिली होती.
परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारत सरकार या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. येमेनी अधिकारी आणि निमिषा यांच्या कुटुंबाशी सतत संपर्कात आहे. निमिषा 2017 पासून येमेनी तुरुंगात आहे. तिच्यावर येमेनी नागरिक तलाल अब्दो महदीला औषधाचा अतिरिक्त डोस देऊन हत्या केल्याचा आरोप आहे. निमिषा आणि महदी येमेनमधील एका खासगी क्लिनिकमध्ये भागीदार होते. महदीच्या हत्या प्रकरणात आरोपी असल्यामुळे निमिषाला फाशी सुनावली जाणार असून तिच्या शिक्षेला स्थगिती मिळविण्यासाठी भारताकडे आता केवळ पाच-सहा दिवसांचा अवधी राहिला आहे. या प्रकरणात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार जॉन ब्रिटास यांनीही परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र लिहून येमेनमधील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून निमिषा प्रियाची फाशी त्वरित थांबवण्याची विनंती केली आहे.
2008 मध्ये केरळमधील पलक्कड येथील रहिवासी 19 वर्षीय निमिषा प्रिया नोकरीसाठी येमेनला पोहोचली होती. तिला राजधानी साना येथील एका सरकारी रुग्णालयात परिचारिका म्हणून नोकरी मिळाली. 2011 मध्ये निमिषा लग्नासाठी भारतात परतली. तिने कोची येथील रहिवासी टॉमी थॉमसशी लग्न केले आणि दोघेही येमेनला आले. येथे थॉमसला इलेक्ट्रिशियन असिस्टंट म्हणून नोकरी मिळाली, पण पगार खूपच कमी होता. 2012 मध्ये, निमिषा यांनी मिशाल नावाच्या मुलीला जन्म दिला, परंतु येमेनमध्ये उदरनिर्वाह करणे कठीण झाले. 2014 मध्ये थॉमस आपल्या मुलीसह कोचीला परतले. त्यानंतर त्यांनी ई-रिक्षा चालवायला सुरुवात केली. याचदरम्यान, निमिषा हिने कमी पगाराची नोकरी सोडून क्लिनिक उघडण्याचा निर्णय घेतला. मात्र, येमेनच्या कायद्यानुसार निमिषा हिला स्थानिक सबळ पुराव्याची आवश्यकता होती. या काळात निमिषाची ओळख महदीशी झाल्याने दोघांनी मिळून क्लिनिक सुरू केले होते.









