चार प्रभागचे 20 वॉर्ड, एक वॉर्ड एक प्रभागाचा होणार; प्रभाग संख्या कमी केल्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिक फेटाळल्याचे परिणाम
कोल्हापूर प्रतिनिधी
शिंदे-फडणवीस सरकारने नगरसेवकांची संख्या कमी केल्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल होती. न्यायालयाने ती फेटाळल्याने मुंबईसह कोल्हापूर महापालिकेतील प्रभाग संख्या पूर्वीप्रमाणेच होणार आहे. परिणामी महापालिकेने अंतिम टप्प्यात आलेली 92 सदस्यनुसारची केलेल्या निवडणूक प्रक्रिया रद्द झाली. आता नव्याने 81 प्रभागानुसार निवडणूक प्रक्रिया राबवावी लागणार आहे. याचबरोबर बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणूक असणार आहे.
कोल्हापूर महापालिकेची 15 नोव्हेंबर 2020 रोजी सभागृहाची मुदत संपली. कोरोना, ओबीसी आरक्षण, प्रभाग संख्या या कारणांमुळे निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडली. दरम्यान, महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असताना वाढत्या लोकसंख्येचा विचार करून प्रभागांची संख्या वाढविली. यानुसार कोल्हापूर महापालिकेची 30 वॉर्ड त्रिसदस्यी आणि एक वॉर्ड दोन सदस्यीय असे 92 सदस्यानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू केली होती. प्रक्रिया अंतिम टप्प्यावर आली असताना राज्यात सत्तांतर झाले. शिंदे-फडणवीस सरकारने 81 सदस्यानुसार निवडणूक घेण्याचे आदेश दिले. दरम्यान, या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने निवडणुकीला पुन्हा ब्रेक लागला. आता मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारच्या सदस्य संख्या कमी करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिकाच फेटाळली. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेची अंतिम टप्प्यावर आलेली 91 सदस्यांनुसारची निवडणूक प्रक्रिया रद्द झाली आहे. यामुळे 81 सदस्यनुसार निवडणुकीवर शिक्कामोर्तब झाला आहे.
चौथ्यांदा निवडणूक प्रक्रिया राबविणार
महापालिकेची 81 सदस्य आणि एक सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यावर आली असताना कोरोनामुळे पूर्ण होऊ शकली नाही. यानंतर 81 सदस्य आणि त्रिसदस्यीय आणि 30 वॉर्ड त्रिसदस्यीय आणि एक वॉर्ड दोन सदस्य अशी 91 सदस्यनुसार प्रभाग रचना अशी एकूण तीन वेळा अंतिम टप्प्यात आलेली निवडणूक रद्द झाली. आता चौथ्यांदा निवडणूक प्रक्रिया राबवावी लागणार आहे.
इच्छुकांची ‘वेट अँड वॉच’
तीन वेळा निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्यानंतर रद्द झाल्याने इच्छुकांनी आता वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. जेव्हा निवडणुकीचा अर्ज दाखल करणे, माघार आणि मतदान असा अंतिम टप्प्यातील कार्यक्रम जेव्हा जाहीर होईल तेव्हा पत्ते खोलण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.
चार प्रभागाचा एक वॉर्ड
महापालिकेची निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार हे स्पष्ट आहे. परंतू त्रिसदस्यीय की चार सदस्यीय यावर शिक्कामोर्तब नाही. भाजप चार सदस्यीय प्रभाग रचनेवर ठाम आहे, असे झाल्यास 20 वॉर्ड चार सदस्यीय आणि एक वॉर्ड एक सदस्यीय होण्याची दाट शक्यता आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाची प्रतिक्षा
मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला असला तरी राज्य निवडणूक आयोग जोपर्यंत कोल्हापूर महापालिका प्रशासनास अधिकृत निवडणूक प्रक्रियेबाबत स्पष्टीकरण करत नाही. तोपर्यंत चित्र स्पष्ट होणार नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाची प्रतिक्षा मनपा प्रशासनाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयात मुंबई महापालिका संदर्भातील सदस्य संख्याबाबतच्या याचिकेवर निर्णय झाला. यानुसारच कोल्हापूर महापालिकेत याची अंमलबजावणी करण्याबाबत कोणतेही अधिकृत आदेश नाहीत. त्यामुळे निवडणूकीचे कोणतेच काम सध्या सुरू करणार नसून राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतरच पुढील कार्यवाही करू.
रविकांत आडसुळ, उपायुक्त, महापालिका
‘ओबीसी’चा तिढा कायम
महापालिकेने 91 सदस्यनुसार ओबीसी आरक्षण काढले होते. परंतू सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल असून निर्णय प्रलंबित आहे. सध्या 81 नगरसेवक असणार यावर शिक्कामोर्तब झाला असला तरी ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णायची प्रतिक्षा करावी लागणार आहे.









