वाराणसी न्यायालयात 22 मे रोजी पुढील सुनावणी ; मुस्लीम पक्षाचे आक्षेपही समजून घेणार
वृत्तसंस्था/ वाराणसी
वाराणसी न्यायालयाने ज्ञानवापीच्या एएसआय सर्वेक्षणाची मागणी करणारी हिंदू बाजूची याचिका स्वीकारली आहे. यावर पुढील सुनावणी 22 मे रोजी होणार आहे. न्यायालयाने मुस्लीम पक्षाला आक्षेप नोंदवण्यासाठी 19 मेपर्यंत मुदत दिली आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजता चार फिर्यादी महिलांनी न्यायालयात नव्याने याचिका दाखल केली होती. यामध्ये ज्ञानवापी परिसराच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाची (एएसआय) मागणी करण्यात आली होती. याचिका दाखल करण्यापूर्वी विष्णू जैन यांच्यासह याचिकाकर्त्यांनी सकाळी काशी विश्वनाथ धामला भेट दिली. यापूर्वी शुक्रवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाने ज्ञानवापी परिसरातील कथित शिवलिंगाचे कार्बन डेटिंग आणि वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते.
2021 मध्ये वाराणसीच्या दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभागीय न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीच्या पुरातत्व सर्वेक्षणास मान्यता दिली. ज्ञानवापी वादाच्या संदर्भात न्यायालयाने न्यायालयीन आयुक्त नियुक्त केले आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षणची (एएसआय) एक टीम तयार केली. या पथकाला ज्ञानवापी पॅम्पसचे सर्वेक्षण करण्यास सांगितले होते. वाराणसीच्या ज्ञानवापी परिसर वुजुखाना येथे 16 मे 2022 रोजी शिवलिंगाची प्रतिकृती सापडली होती. आता प्रयागराज न्यायालयाने कार्बन डेटिंगला परवानगी दिली असून त्याची तारीख लवकरच ठरवली जाणार आहे.
आता यासंबंधी वाराणसी उच्च न्यायालयातही याचिका मान्य करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने एएसआयच्या वकिलांना 22 मे रोजी वाराणसी जिल्हा न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. त्यानंतर वैज्ञानिक सर्वेक्षण कसे करायचे, याबाबत जिल्हा न्यायालय पुढील आदेश देणार आहे. आता शिवलिंगाचे वैज्ञानिक सर्वेक्षण कसे करायचे याचा निर्णय वाराणसी जिल्हा न्यायालय देणार असल्याचे विष्णू शंकर जैन यांनी सांगितले.









