‘ज्ञानवापी’चा सर्वेक्षण अहवाल आज वाराणसी सेशन कोर्टात सादर होणार नाही. कोर्ट कमिश्नर विशाल सिंह यांनी अहवाल तयार करण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा अवधी मागितला आहे. दरम्यान ‘ज्ञानवापी’ मशिद सर्वेक्षणाची थोड्याच वेळात सुप्रिम कोर्टात सुनावणी होणार आहे. शिवलिंग सापडल्याच्या दाव्यावर मुस्लिम पक्षकारांचा आक्षेप आहे, त्यामुळे त्यांनी सुप्रिम कोर्टात धाव घेतली आहे.
ज्ञानवापी मशिदीसंदर्भात वाराणसी कोर्टात आणखी एक नवी याचिका दाखल करण्यात आलेली आहे. तीन महिलांनी हि याचिका दाखल केली असून, संपूर्ण देशाचे लक्ष याकडे लागले आहे. मशिदीच्या पूर्वेकडील नंदीसमोरची भिंत, शिवलिंगाच्या बाजूची भिंत तोडण्याची याचिकेत मागणी करण्यात आली आहे. बंद असलेला पश्चिम दरवाजा उघडण्याचीही मागणी करण्यात आली आहे. सीता, मनू आणि रेखा पाठकांनी वाराणसी सेशन कोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
मुस्लिम संघटनांनी दावा फेटाळला
वाराणसीतील ज्ञानवापीला मोठं धार्मिक स्थळ म्हणून ओळखल जातं. गेल्या तीन दिवसांपासून येथील सर्वेक्षण सुरु आहे. यामध्ये शिवलिंग सापडलेल्याचा दावा हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आला आहे. मात्र मुस्लिम संघटनांनी हा दावा फेटाळून लावला आहे.
वाराणसी कोर्टात सध्या 3 याचिकांवर सुनावणी सुरु
प्रार्थना स्थळाच्य़ा कायद्यावरून हा खटला सुरु आहे. वाराणसी कोर्टामध्ये सध्या 3 याचिकांवर सुनावणी सुरु आहे. ज्ञानवापीच्या चारही भिंती पाडण्यात याव्या, पश्चिमिकडील दरवाजा उघडण्यात यावा तसेच वजूखाना आणि शौचालय स्थलांतरीत करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.