वृत्तसंस्था / प्रयागराज
उत्तर प्रदेश राज्यातील मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी प्रकरणी सादर करण्यात आलेली याचिका प्रयागराज येथील अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मात्र, ती गुणवत्तेवर फेटाळण्यात आली नसून तांत्रिक कारणास्तव फेटाळल्याचे दिसन आहे. या प्रकरणी मथुरा येथील न्यायालयात अनेक अभियोग प्रलंबित आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयातही हे प्रकरण प्रलंबित असल्याने याचिका फेटाळण्यात येत आहे, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
ही याचिका हिंदू पक्षकारांकडून सादर करण्यात आली होती. कृष्णजन्मभूमीतच भगवान श्रीकृष्णाचे मंदीर होते. ते पाडवून तेथे मशीद स्थापन करण्यात आली आहे. तेथे इदगाहही निर्माण करण्यात आला आहे. हे स्थान मूळचे हिंदूंचेच असल्याने तेथे हिंदूंना पूजाअर्चा करण्यास अनुमती द्यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. तथापि, याचिका फेटाळण्यात आली आहे.
2020 मधील याचिका
ही याचिका हिंदू लोकांनी सादर केली होती. ती 2020 मध्येच सादर करण्यात आली होती. याच कालावधीत मथुरा येथील कनिष्ठ न्यायालयात हिंदूंनी अभियोग सादर करुन रामजन्मभूमीच्या धर्तीवर कृष्णजन्मभूमीही हिंदूंना मिळावी अशी मागणी केली आहे. ही मागणी करणारे अन्य काही अभियोगही सादर करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयातही हिंदूंच्या अधिकारांचे संरक्षण करण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या याचिका सादर करण्यात आल्या आहेत.
प्रयोजन नाही
अनेक अभियोग आणि याचिका प्रलंबित असताना त्याच विषयाशी संबंधित नवी याचिका उच्च न्यायालयात सादर करण्याचे कोणतेही प्रयोजन नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. श्रीकृष्णजन्मभूमीचा प्रश्न अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्रश्नाप्रमाणे सोडवायचा किंवा नाही, याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय करु शकते. तशी मागणी करणारी याचिका तेथे प्रलंबित आहे. त्यामुळे अलाहाबाद उच्च न्यायालयाला त्यात लक्ष घालण्याचे कारण नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.









