वार्ताहर/ गुंजी
गुंजी (ता. खानापूर) परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या भात पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाल्याने येथील शेतकरीवर्ग चिंतातूर झाला आहे. या किडीमुळे भात पिकांची पाने कुरतडली जात असून पाने पांढरी पडत आहेत. त्यामुळे भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. काही ठिकाणी पाने गुंडाळणाऱ्या किडीचा प्रभाव दिसून येत आहे. या भागातील बऱ्याच शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने मे अखेरीस पेरणी केली आहे. अशा शेतकऱ्यांची भात पिके जोमात आहेत. मात्र, काही शेतकऱ्यांनी उशिरा भात लागवड केली आहे. अशा भात पिकांवर किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याचे शेतकऱ्यांतून सांगण्यात येत आहे. काही शेतकऱ्यांनी यावर औषध फवारणी केली असली तरी त्याचा परिणाम होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
गुंजी कृषी विभागाकडे कोणतेही कीटकनाशक उपलब्ध नसल्याने येथील शेतकऱ्यांना खासगी दुकानांतून औषधे विकत घ्यावी लागत आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना प्रवास, वेळ आणि पैसा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे गुंजीत कृषी कार्यालय असूनही येथील शेतकऱ्यांना गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
याविषयी संबंधितांना विचारले असता गुंजी कृषी विभागाकडे यावर्षी तालुका विभागाकडून कोणतेच कीटकनाशक आले नसून गतवर्षीच्या क्लोरोपारीफॉस या कीटकनाशकाचे काही प्रमाणात वितरण केले. यंदाही कीटकनाशकाची मागणी केली असून ती उपलब्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिली जातील, असे सांगण्यात आले.









