शेतकरी चिंतेत : कृषी खात्याकडून सर्वेक्षण : उत्पादनात घट होण्याची शक्यता
बेळगाव : जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी तीन लाखांहून अधिक क्षेत्रात पेरणी झाली आहे. मात्र, बदलत्या हवामानाचा परिणाम पिकांवर झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. विशेषत: कडधान्य पिकावर किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची चिंता लागली आहे. यंदा परतीचा पाऊस लांबणीवर पडला होता. त्यामुळे काही भागात मक्याऐवजी वाटाणे, मसूरची पेरणी झाली आहे. परतीच्या पावसाने पेरणीचे क्षेत्र वाढले आहे. मध्यंतरी थंडी, धुके पडल्याने पोषक वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता पिकांवर किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे. कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विविध भागाला भेट देऊन पिकांची पाहणी केली आहे. बैलहोंगल तालुक्यात सर्वाधिक वाटाणा पिकाची पेरणी झाली आहे. मात्र, आता किडीमुळे पीक धोक्यात आले आहे. तर बैलहोंगल, सौंदत्ती, रामदुर्ग तालुक्यातही वाढत्या किडीने शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत.
अधिकारी, तज्ञांकडून पाहणी
जिल्ह्यातील विविध भागांमध्ये कृषी अधिकारी व तज्ञांकडून पाहणी करण्यात आली आहे. शिवाय कीड पडलेल्या पिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना कीडनाशक औषधांबाबत माहिती देण्यात आली आहे. मका, ज्वारी आणि इतर पिकांवर अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. अशा पिकांवर औषध फवारणीबाबत माहिती देण्यात आली आहे.
चिकू लागवडीत वाढ
कमी खर्चीक असलेल्या चिकू लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. गतवर्षीपेक्षा चिकू लागवडीचे क्षेत्र 10 हजार हेक्टराने वाढले आहे. बैलहोंगल, कित्तूर, रामदुर्ग, सौंदत्ती, अथणी तालुक्यात एकूण 1.34 लाख हेक्टरात चिकूची लागवड झाली आहे.
कीड नियंत्रणासाठी उपाययोजना हवी
जिल्ह्यात वाटाणा पिकाच्या उद्दिष्टापेक्षा अधिक पेरणी झाली आहे. पिकाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. कृषी पथकाकडून सर्वेक्षण केले जात आहे. काही ठिकाणी किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.
– शिवनगौडा पाटील (कृषी खाते सहसंचालक)









