यादव फुलाशेजारी नवीन पूल बांधण्याची गरज…
कोल्हापूर
शिरोळ तालुक्यातील दत्त क्षेत्र नृसिंहवाडी येथे सातत्याने वाढणारी भाविकांची गर्दी दोन चाकी, चार चाकी वाहनांची यामुळे गर्दी वाढली असून सण, समारंभ, सुट्टी, शुभ कार्य यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येत असतात. येणाऱ्या लोकांच्या वाहनामुळे सातत्याने कुरुंदवाड- नृसिंहवाडी- शिरोळ मार्गावर वाहतुकीची कोंडी होत असते. मात्र यापूर्वी अनेक वेळा मागणी करून देखील या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी शिरोळ पोलीस ठाण्याकडून वाहतूक नियंत्रक पोलिसांची नेमणूक होण्याबाबत काहीही निर्णय होत नाही आहे. जेणेकरून ही समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकते अशा भावना आलेख नागरिकांनी व्यक्त केल्या.
रविवार म्हणजे सार्वजनिक सुट्टी, लग्न, मुंज, मुहूर्त तसेच परिसरातील साखर कारखान्यांची होणारी ऊस वाहतूक, त्यातच येणाऱ्या लोकांची वाहनांची गर्दी अशातच विविध कारणासाठी आलेल्या वाहनधारकांनी आपली वाहने रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग केलेली असतात. यामुळे मार्गावर सातत्याने वाहतुकीची कोंडी होऊन वाहनधारकांमध्ये वादावादीचे प्रसंग घडत आहेत. रविवारी दुपारी ही असाच प्रसंग घडला यादव फुलावर अचानक दोन अवजड वाहने समोरासमोर आल्यामुळे या पुलावर वाहतुकीची कोंडी झाली. तसेच या पुलाच्या दक्षिण उत्तर बाजूस ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ट्रक तसेच चार चाकी वाहने, एसटी बसेस यांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे वाहतुकीची कोंडी सुमारे दोन तास झाली होती.
या तीर्थक्षेत्राच्या मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत संबंधित प्रशासनाने वाहतूक नियंत्रक पोलीस नेमवा अशी मागणी वारंवार केली आहे. मात्र याकडे पोलीस प्रशासनाने आत्तापर्यंत दुर्लक्ष केले आहे. येथे सातत्याने गुरुवार शनिवार रविवार तसेच सार्वजनिक सुट्टी लग्न मुंज आधी शुभ कार्य किमान या दिवशी तरी शिरोळ पोलीस ठाण्यामार्फत वाहतूक नियंत्रक पोलीस नेमवा अशी मागणी होत आहे.
रविवारी दुपारी दोनच्या दरम्यान ही वाहतूक कोंडी सुरू झाली होती. मात्र यातूनच एक व्हीआयपी व्यक्ती ही पोलीस ताफ्यातून कुरुंदवाडकडे निघून गेली. मात्र या वाहनाने आपापला मार्ग काढून ती वाहने निघून गेली. सर्वसामान्य वाहनधारक मात्र या कोंडीतच अडकले होते. याबाबत त्या संबंधित पोलिसांना कोणतेच सोयर सुतक नसल्याचे दिसून आले.
दीड तासाहून अधिक काळ ही वाहतूक कोंडी अशीच होती. यातीलच काही वाहनधारकांनी पुढाकार घेत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला व धिम्या गतीने पुन्हा वाहतूक सुरू झाली. या घटना या मार्गावर वारंवार घडत आहेत. मात्र यावर पोलीस प्रशासन कोणतीच कार्यवाही करताना दिसत नाही. यामुळे वाहनधारकाच्यातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.
यादव पुलाशेजारी नवीन पूल बांधावा… वाहनधारकांची मागणी
सलगरे पाचवा मैल हा मार्ग येथून जातो. या मार्गाचे रुंदीकरण झाले आहे. रस्ता रुंद व मोठा झाला आहे. त्यामुळे वाहनांचे वेग हे वाढले आहे. मात्र या मार्गावर पंचगंगा नदीवरील यादव पूल हा अरुंद आहे. त्यामुळे सातत्याने या पुलावर व त्याच्या दोन्ही बाजूस वाहतूक कोंडी होत असते. संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन या यादव पुलाशेजारी नवीन पूल बांधणे गरजेचे आहे. जेणेकरून या मार्गावरील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होऊ शकते.








