नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कामाच्या आणि रोजगाराच्या आमिषाने म्यानमारमध्ये नेण्यात आलेल्या 800 हून अधिक भारतीयांचा अनन्वित छळ होत असल्याची माहिती समोर येत आहे. या भारतीयांना सायबर गुन्हे करणाऱया कंपन्यांनी वेठीस धरले असून त्यांच्याकडून बेकायदेशीर कामे करुन घेतली जात आहेत, असा आरोप होत आहे. दरम्यान, त्यांच्या सुटकेसाठी भारत सरकारने जोरदार प्रयत्न सुरु केले असून म्यानमार प्रशासनाशी बोलणी चालविली आहेत.
या भारतीयांमध्ये ग्राफिक डिझायनर्स आणि इतर संगणकासंबंधीची कामे करणाऱया तंत्रज्ञांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यांच्यातील 13 जण तामिळनाडूतील असून काहीजण केरळमधील आणि इतर राज्यांमधील आहेत. अधिक पैसा मिळेल असे आमिष त्यांना दाखविण्यात आल्याने ते एका बेकायदेशीर दलाल कंपनीच्या माध्यमातून म्यानमारमध्ये गेले आहेत. मात्र, आता त्यांची सुटका होणे कठीण असल्याचे मानले जात आहे. तथापि, गेल्या 15 ऑगस्टला यांपैकी काही जणांची सुटका झाली होती. त्यांनी तेथील दयनीय परिस्थिती कथन केल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. म्यानमारमध्ये अडकलेल्या भारतीयांना कामाचे लक्ष्य ठरवून देण्यात येत असून ते पूर्ण न झाल्यास त्यांना विजेचे झटके देण्यात येतात. कोंडून ठेवण्यात येते. तसेच उपाशी ठेवून मारहाणही करण्यात येते. अनेक प्रकारे त्यांचा छळ केला जातो, अशी माहिती आता बाहेर येऊ लागली आहे.
म्यानमार लष्कराचेही अत्याचार
या भारतीयांपैकी 200 हून अधिक जणांना बेकायदेशीररित्या म्यानमारमध्ये प्रवेश केल्याच्या संबंधात तेथील लष्करी प्रशासनाने पकडले होते. लष्करानेही त्यांना गुन्हेगार मानून त्यांचा छळ केला. त्यांना बराच काळ गुढघ्यावर चालविण्यात आले. अर्धपोटी ठेवण्यात आले. अशाप्रकारे दोन्हीकडून त्यांच्यावर संकटाची कुऱहाड कोसळली आहे.









