मालवण / प्रतिनिधी
चार मच्छीमार जखमी, एकजण गंभीर; आचरेसमोरील समुद्रात मध्यरात्रीची घटना
आचरेसमोरील दहा वाव खोल समुद्रात शुक्रवारी मध्यरात्रीच्य सुमारास एका पर्ससीन ट्रॉलरने एका पारंपरिक मासेमारी करणाऱ्या फायबर नौकेला जोरदार धडक दिली. यात फायबर नौकेतील चारही मच्छीमार जखमी झाले असून एकाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे कळते. जखमींवर मालवण तालुक्याबाहेरील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राप्त माहितीनुसार जखमी मच्छीमार शुक्रवारी रात्री बुडी नावाची पारंपरिक मासेमारी करण्यासाठी गेले होते. जाळी समुद्रात टाकून झाल्यानंतर ते नौकेत झोपी गेले होते. याच दरम्याने एका पर्ससीन ट्रॉलरची धडक बसून चारही मच्छीमार पाण्यात फेकले गेले. पर्ससीन ट्रॉलरवरील मच्छीमारांनी पाण्यात उड्या मारून चारही मच्छीमारांना आपल्या ट्रॉलरवरून किनाऱ्यावर आणले आणि तात्काळ तालुक्याबाहेरील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. दुर्घटनाग्रस्त फायबर नौका मालवणातील एका स्थानिक बंदरात आणण्यात आली आहे. या अपघाताची मालवण किनारपट्टीवर जोरदार चर्चा सुरू होती.









