वेंगुर्ला / प्रतिनिधी –
जगाच्या नकाशावर पर्यटन जिल्हा म्हणून नोंद झालेल्या `पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन विकासासाठी केंद्र व राज्य शासनाने केलेल्या योजनांना शासनाच्या अधिकाऱ्यांकडून नियम दाखवून अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. असा प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागातील तंबूनिवास व्यावसायिकांवर आला आहे. याबाबत संघटीतपणे न्याय मिळविण्यासाठी वेंगुर्ले साईडिलक्स हॉलमध्ये दि. 25 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता सिंधुदुर्गातील तंबूनिवास व्यावसायिकांची खास बैठक आयोजीत करण्यांत आली आहे. या बैठकिस जिल्ह्यातील तंबू व्यावसायिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वेळागर सर्व्हे नं 39 च्या यशस्वी लढय़ाचे नेते जयप्रकाश चमणकर यांनी केले आहे.
शासनाच्या पर्यटन विकास धोरणातील योजनांचा लाभ घेऊन रोजगार व स्वयंरोजगाराची कास धरणाऱ्या, तसेच शासनाच्या योजनेसाठी अर्ज करून ते पैसे न मिळताही स्वत: कडील कमावलेली पुंजी, दागदागिने गहाण ठेवून प्रामाणिकपणे तंबूनिवास व्यवसाय चालू केलेल्या व्यावसायिकांना सी.आर.झेड. नियम, तसेच जागा वापर महसुल कर, यासह अन्य बाबतीत शासनाचे अधिकारी कर्मचारी या व्यावसयिकांनी दरवर्षी हजारो रूपयांचा दंड करीत आहे. मात्र दंड आकारूनहि त्यांना त्या व्यवसायासाठी परवानगी दिली जात नाही. यामुळे जिल्ह्यातील शेकडो पर्यटन तंबूनिवास धारक व्यावसायिक अडचणी आले आहेत.









