स्वाभिमानीसह अन्य पक्षांचा मुंबईत धडक मोर्चा
कोल्हापूर प्रतिनिधी
राज्यातील गायरान जमीनीवरील बांधण्यात आलेल्या घरामधील गोरगरीब कुटूंबाना सरकार रस्त्यावर आणणार नाही. हि अतिक्रमणे कशापद्धतीने कायम करता येतील, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील विविध पक्षांच्यावतीने मुंबई विधानभवनावर काढण्यात आलेल्या मोर्चेच्या शिष्टमंडळाला दिले.
गायरान अतिक्रमण प्रश्नी शासनाने बजावलेल्या नोटीसांच्या विरोधात राज्यभरातील नागरिकांनी बुधवारी मुंबईत विधानभवनावर धडक मोर्चा काढला. याप्रसंगी बोलताना माजी खासदार शेट्टी म्हणाले, देशात व महाराष्ट्रात स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून करोडो-लाखो गरीब लोक हे भूमिहिन असून इंग्रज सरकारने, हैद्राबाद नवाबाने सुध्दा गोरगरीब लोकांना सरकारी जमिनी, वतने, इनाम सोबतच दिलेल्या होत्या. त्यांनाच आज सरकारने अमिक्रमणधारक ठरवले आहे. तर दुसऱ्या बाजूला जवळपास साडेपाच लाख कुटूंबे ही स्वत:च्या राहत्या घरात असून राज्यातील या लाखो गोरगरीब भुमिहिनांना अतिक्रमणधारक ठरवत आहेत. याऊलट राज्यातील राज्यकर्त्यांनी हजारो एकर गायरान जमीनी सुतगिरणी , साखर कारखाने, शैक्षणिक संस्था, औद्योगिक वसाहती याकरिता बळकावून त्या विकून हजारो कोटी रूपयाची लुबाडणूक केली आहे. त्याची चौकशी करून त्या ताब्यात घेण्याची मागणी यावेळी माजी खासदार शेट्टी यांनी केली.
आझाद मैदान येथून मोर्चास सुरुवात झाल्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने शासनाकडून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिष्टमंडळास विधानभवनामध्ये चर्चेसाठी निमंत्रीत केले. त्यांनी शिष्टमंडळासोबत चर्चा करत अतिक्रमण न काढणेबाबत सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी, अॅड. सुरेश माने, प्रताप होगाडे, अमरसिंह पाटील, मच्छिंद्र गवाले, सुभाष मुढे, नानाभाऊ शेवाळे, नामदेव चव्हाण आदी उपस्थित होते. मोर्चाला बी. आर. एस.पी, सी.पी.आय, सी.पी.आय. (एम.), शेकाप, स्वाभिमानी पक्ष, जनता दल (सेक्युलर), समाजवादी पार्टी, आर.पी.आय. (सेक्युलर), एकलव्य सेना, लाल निशान पक्ष, बहुजन विकास आघाडी, सी.पी.आय. (एम.एल), सत्यशोधक कम्यूनिस्ट पार्टी आदी पक्षांनी पाठींबा दिला.








