26/11 मुंबई हल्ला खटला : दिल्ली न्यायालयाचा निकाल
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्लीच्या एका न्यायालयाने एनआयएला 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा याच्या आवाजाचे आणि हस्ताक्षराचे नमुने घेण्याची परवानगी दिली आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रजीत सिंह यांनी हा निर्णय दिला. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) अधिकाऱ्यांनी तहव्वूर राणा याची चौकशी सुरू ठेवली आहे. त्याच्यावरील आरोप अधिक भक्कमपणे सिद्ध करता यावेत यासाठी एनआयए अधिकाऱ्यांकडून तहव्वूर राणाच्या आवाजाचे नमुने घेतले जाऊ शकतात. या नमुन्यांच्या आधारे 26 नोव्हेंबर 2008 च्या हल्ल्यादरम्यान तहव्वूर फोनवरून सूचना देत होता का, हे एनआयए शोधून काढेल. आवाजाचा नमुना घेण्यासाठी न्यायालयाची परवानगी अत्यावश्यक मानल्यामुळे तपास यंत्रणांनी यासंबंधी पावले उचलत अनुमती मिळविली आहे. दुबईमध्ये राणा ज्या व्यक्तीशी बोलला होता त्याला हल्ल्याबद्दल काही माहिती होती की नाही हे शोधण्यासाठी एनआयए टीम आता आरोपी तहव्वूर राणाचा आवाज नमुना घेण्याची तयारी करत आहे.
आवाजाच्या नमुन्यांसोबतच कॉल डिटेल्सची तपासणीही केली जाईल. जर आवाजाचे नमुने जुळले तर कटाबद्दल काहीतरी शोध लागण्याची शक्यता वाढेल. अमेरिकेतून प्रत्यार्पणानंतर राणाला 10 एप्रिल रोजी एका खास विमानाने भारतात आणण्यात आले. त्याला आणण्यासाठी एनआयएची एक टीम गेली होती. ‘ऑपरेशन राणा’ या अत्यंत गुप्त मोहिमेअंतर्गत हे प्रत्यार्पण करण्यात आले. भारतात आणल्यानंतर त्याला 10 एप्रिल रोजी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर त्याला एनआयए कोठडीत पाठवण्यात आले. 30 एप्रिल रोजी न्यायालयाने 12 मे पर्यंत कोठडी वाढवली होती. ऑक्टोबर 2009 मध्ये शिकागो येथे अमेरिकन एजन्सी एफबीआयने राणाला अटक केली होती. मुंबई आणि कोपनहेगनमध्ये 26/11 चे दहशतवादी हल्ले करण्यासाठी आवश्यक साहित्य पुरवल्याचा आरोप त्याच्यावर होता. 26 नोव्हेंबर 2008 रोजी 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे मुंबईत प्रवेश केल्यानंतर रेल्वे स्टेशन, दोन हॉटेल्स आणि एका ज्यू केंद्रावर हल्ला केला. सुमारे 60 तास चाललेल्या या हल्ल्यात 166 लोक ठार झाले होते.









