आजी-माजी पैलवान संघटना-ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीला निवेदन
वार्ताहर/उचगाव
उचगाव येथील सूरवीर गल्लीमध्ये असलेल्या प्राचीनकालीन तालीम पुन्हा प्रारंभ करण्यासाठी ग्रामपंचायतने परवानगी द्यावी आणि सर्व सोयी उपलब्ध करून सहकार्य करावे, अशा आशयाचे निवेदन गावातील आजी माजी पैलवान संघटनेच्या व ग्रामस्थांच्या वतीने पिडिओ शिवाजी मडिवाळ यांना देण्यात आले. उचगावमध्ये अशा अनेक तालीम आखाडे आहेत. मात्र सध्या ते बंद पडलेले आहेत. या तालमीतून तयार झालेल्या अनेक पैलवानांनी बेळगाव जिह्यातील कुस्ती आखाडे गाजवलेले होते. मात्र अलीकडच्या काळात कुस्ती आखाडे बंद पडल्याने या तालमी आता ओस पडत चाललेल्या आहेत. मात्र काही जुन्या जाणत्या पैलवान मंडळींनी एकत्र येऊन ही तालीम पुन्हा सुरू करावी आणि या तालीममध्ये नवीन होतकरू युवकांना पैलवानचे धडे देऊन पुन्हा एकदा कुस्ती आखाड्यामध्ये उचगावचे नाव उज्ज्वल करावे. यासाठी सदर तालीम सुरू करण्यास ग्रा.पं.ने परवानगी द्यावी. याबरोबरच या ठिकाणी वीज, पाणी, बाथरूम व इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा आशयाचे निवेदन बुधवारी ग्रा.पं.ला देण्यात आले. यावेळी माजी सदस्य बी. एस. होनगेकर, सदस्य बळवंतराव उर्फ बंटी पावशे, विद्यमान सदस्य जावेद जमादार, पशराम चौगुले, भगवान पाटील, मनोहर हावळे व ग्रामस्थ उपस्थित होते.









