रत्नागिरी :
शासन नियमाप्रमाणे काही दिवसच बंदी काळात उरलेले होते. त्याचवेळी हवामान व वातावरण (वादळी वारे) बदलल्यामुळे १० मे पासूनच रत्नागिरीतील ट्रॉलिंग फिशिंग पध्दतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या नौका मासेमारीसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे शासनाने आम्हा शाश्वत व पारंपरिक मच्छीमार नौकांसाठी अधिकृत १५ जूनपर्यंत परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.
त्यासाठी येथील सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय विभाग रत्नागिरी तथा अभिनिर्णय अधिकारी, रत्नागिरी यांना शाश्वत व पारंपरिक मच्छीमार नौका मालक संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले. आम्ही शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून आजपर्यंत आम्ही मच्छीमारी करीत असतो व आहेत. त्याचप्रमाणे जर का आम्हां मच्छीमारांवरती शासनाने या वेळेला सहानुभूतीपूर्वक आमच्या मागणीचा गांभीर्याने विचार केला जावा. नुकत्याच झालेल्या वादळी वातावरणामुळे मच्छीमार बंदी वेळेआधीच आमच्या नौका बंद ठेवण्याची वेळ आली. त्यामुळे मच्छी व्यवसायाला फटका बसला आहे. आज ज्या आमच्या नौका फिशिंग ट्रॉलिंग पध्दतीने मासेमारीसाठी चालू आहेत, त्या नौकांवरती जे तांडेल, खलाशी व कामगार आहेत. त्यांचेही आम्ही नौकामालक मच्छीमार पगार देण्याचीही आर्थिक अडचण उभी राहिली आहे. या सर्व गोष्टींना कारणीभूत आजतागायत बेकायदेशीररित्या चालू असलेले व शासनाचे सर्व नियम पायदळी तुडवून मासेमारी करीत असलेले पर्ससीननेट, मिनी पर्ससीन (यामा मशीनद्वारे) नेट, तसेच एल.ई.डी. मासेमारी हे सर्व आहेत. त्यामुळे या सर्व विषयांचा शासनाने गांभिर्यपूर्वक विचार करुन आम्हांला न्याय देऊन १५ दिवस मच्छीमारी करण्यासाठी कायदेशीररित्या परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे शासनाचा पहिला जुना नियम होता की, मासेमारी बंदी काळ १० जून ते १५ ऑगस्ट किंवा नारळी पोर्णिमा, तो कालावधी नियम मासेमारीसाठी पहिल्यासारखा चालू करण्यात यावा, अशी आम्ही शाश्वत व पारंपरिक मच्छीमार शासनाजवळ मागणी करत आहोत. या मागण्यांबाबत शासनाने मच्छीमारांना सहकार्य न झाल्यास तालुक्यात कुठेही शांतता भंग झाल्यास या गोष्टीला जबाबदार शासन व संबंधित अधिकारी असतील, यांची शासनाने नोंद घ्यावी, असेही सूचित केले आहे. हे निवेदन देतेवेळी शाश्वत व पारंपरिक मच्छीमार नौका मालक संघटनेचे रणजित भाटकर, शंकर शिवलकर, सचिन टाकळे, दिनेश सावंत, रोहिदास पारकर, विनायक मयेकर, संजय विलणकर, समीर शेट्ये, वैभव बोरकर, महमन शफी दा. साखरकर, संजय विलणकर, ओमकार बिर्जे, अमर पवार, शुभम पाटील, दिलीप सुर्वे, अमोल भोंगले उपस्थित होते








