एकूण 229 कोटी 57 लाख रुपयांच्या मागविल्या निविदा : नूतनीकरणाच्या कामासाठी 36 महिन्यांचा कालावधी
बेळगाव : विमानतळ प्राधिकरणाने बेळगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी व नूतनीकरणासाठी परवानगी दिली आहे. प्रवासी टर्मिनल बिल्डिंगसह धावपट्टी व इतर सुविधांसाठी विमानतळ प्राधिकरणाने निविदा मागविल्या आहेत. एकूण 229 कोटी 57 लाख रुपयांच्या निविदा मागविण्यात आल्याने बेळगाव विमानतळाला नवीन पंख मिळणार आहेत. बेळगाव विमानतळाच्या नूतनीकरणाच्या कामासाठी 36 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. बेळगावशेजारील हुबळी विमानतळाच्या नूतनीकरणासाठी 228 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या पाठोपाठ बेळगावलाही आता 229 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याने उत्तर कर्नाटकातील एक मोठे विमानतळ म्हणून बेळगावची गणना होणार आहे.
बेळगावला नवीन टर्मिनल बिल्डिंग
बेळगावच्या विमानतळाला नवा लूक देण्याचा प्रयत्न विमानतळ प्राधिकरणाने सुरू केला आहे. एकूण 20 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे टर्मिनलचे बांधकाम केले जाणार आहे. यामध्ये तळमजला व पहिल्या मजल्याचे बांधकाम केले जाणार आहे. भविष्यात विमानांची संख्या वाढणार असल्याने 500 विमाने येतील व 700 विमाने जातील, अशी व्यवस्था केली जाणार आहे. सध्या असणाऱ्या टर्मिनलचे उद्घाटन 14 सप्टेंबर 2017 मध्ये करण्यात आले होते. सध्या 3 हजार 600 चौरस मीटर क्षेत्रफळाची इमारत बेळगावमध्ये उपलब्ध आहे. एकाचवेळी 300 प्रवासी सांभाळण्याची क्षमता आहे. दहा चेक इन काऊंटर उपलब्ध आहेत. तर विमानांच्या पार्किंगसाठी दोन स्टँड आहेत. विमानतळाचे विस्तारीकरण झाल्यास बेळगावच्या विकासाला गती मिळणार आहे. भविष्यात बेळगाव विमानतळाला येणारे महत्त्व पाहून विमानतळ प्राधिकरणाने नवीन लूक देण्याचा प्रयत्न केला आहे.









