पुणे / प्रतिनिधी :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांच्यातील सत्तांतराच्या विषयावरील देखाव्यास पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. उत्सवात वादाचा प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून ही भूमिका घेण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित मंडळाने राज्यातील सत्तांतराच्या घडामोडीचा देखावाच रद्द करुन पौराणिक देखावा सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुण्यातील बुधवार पेठेतील नरेंद्र मित्र मंडळ राज्यातील सत्ता संघर्षाचा देखावा यंदाच्या वर्षी साकारणार होते. त्याकरिता बुधवार पेठेतील मूर्तीकार प्रदीप तारु यांच्याकडे मंडळाने रितसर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मूर्ती साकारण्यासाठी ऑर्डर दिली होती. त्यानंतर शिल्पकाराने हुबेहूब मूर्तीही तयार केल्या. परंतु मंडळाने पोलिसांकडे देखाव्याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी सदर देखाव्याच्या माध्यमातून वादाचा प्रसंग उभा राहू शकत असल्याने त्यास विरोध केला आहे. त्याबाबतची माहिती मंडळास दिल्यानंतर गणेश मंडळाने हा देखावाच रद्द करून दुसरा देखावा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
अधिक वाचा : महाराष्ट्रात खोके हराम संघटना, शिवसेनेची शिंदे गटावर जहरी टीका
मूर्तिकार तारू यांच्या पत्नी म्हणाल्या, आमच्याकडे दरवर्षी वेगवेगळ्या मंडळाच्या देखाव्यासाठी मूर्ती तयार करण्यास येतात. त्याप्रमाणे आम्ही मूर्ती तयार करत असतो. आता संबंधित मंडळाने हा देखावा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पौराणिक देखावा ते सादर करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित मूर्तीत बदल करून त्याचा वापर करण्यात येईल.








