उद्या पदभार स्वीकारणार राजीव कुमार दाखल होणार असल्याने सफाई मोहीम
प्रतिनिधी/ बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राजीव कुमार हे सोमवार दि. 8 रोजी पदभार स्वीकारणार आहेत. त्यांची नियुक्ती होऊन तब्बल एक महिना सात दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर ते पदभार स्वीकारणार आहेत. त्यामुळे यापुढे बेळगाव कॅन्टोन्मेंटला कायमस्वरुपी सीईओ मिळणार आहेत.
कॅन्टोन्मेंट बोर्डचे माजी सीईओ के. आनंद यांच्या मृत्यूनंतर तात्पुरत्या स्वरुपात बेंगळूर येथील अजित रे•ाr यांच्याकडे पदभार देण्यात आला. परंतु, अवघ्या चारच दिवसांनंतर त्यांची इतरत्र बदली करण्यात आली. त्यांच्या जागी राजीव कुमार यांची 1 डिसेंबर रोजी नियुक्ती करण्यात आली. परंतु, ते बेळगावमध्ये रुजू होत नसल्याने तात्पुरत्या स्वरुपात गोवा विभागाचे डीईओ सिद्धार्थकुमार यांच्याकडे पदभार देण्यात आला. परंतु, त्यांचीही बदली झाल्याने अखेर चेन्नई येथील डॉ. विनोद विघ्नेश्वरन हे काही दिवस कॅन्टोन्मेंटचा कार्यभार पहात होते.
कॅन्टोन्मेंट बोर्डचे कायमस्वरुपी सीईओ म्हणून नियुक्त झालेले राजीव कुमार सोमवारपासून बेळगावमध्ये रुजू होत आहेत. यासाठी शनिवारी कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गेस्टहाऊस तसेच कार्यालय परिसर स्वच्छ करण्यात आला. शनिवारी रात्री उशिरा ते बेळगावमध्ये येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे सोमवारपासून कॅन्टोन्मेंट बोर्डला कायमस्वरुपी सीईओ मिळणार आहेत.









