प्लेईंग कंडिशन्समध्ये आयसीसीचे महत्त्वपूर्ण बदल, नवे नियम 1 ऑक्टोबरपासून अंमलात
दुबई / वृत्तसंस्था
चेंडू पॉलिश करण्यासाठी सॅलाईव्हा लावण्याची रीत आता कायमची हद्दपार करण्यात आली आहे. आयसीसीने सध्याच्या प्लेईंग कंडिशन्समध्ये काही नवे महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले असून त्यात सलाईव्हावर कायमची बंदी लादली. नवे सर्व बदल दि. 1 ऑक्टोबरपासून अंमलात आणले जाणार आहेत.
नॉन स्ट्रायकर एण्डवरील फलंदाजाला गोलंदाज धावचीत करत असेल तर त्याला आता अनफेअर प्ले सेक्शनऐवजी रन-आऊट सेक्शनमध्ये ग्राहय़ धरले जाणार आहे. माजी भारतीय कर्णधार व बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्या नेतृत्वाखालील आयसीसी क्रिकेट कमिटीने शिफारस केल्यानंतर त्यावर मुख्य व्यवस्थापकीय समितीने शिक्कामोर्तब केले.
आयसीसीने यापूर्वी चेंडूला चकाकी आणण्यासाठी सॅलाईव्हा लावण्यावर आक्षेप नोंदवला होता. कोव्हिड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर, मेरिलबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) मार्च महिन्यात त्यावर पूर्ण बंदीचा प्रस्ताव मांडला आणि आता याची पूर्ण अंमलबजावणी होणार आहे.
एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर नवा फलंदाजच स्ट्राईकवर येईल, असे आयसीसीने यावेळी स्पष्ट केले. यापूर्वी झेल घेतला गेला, त्यावेळी दोन्ही फलंदाजांनी धाव घेताना एकमेकांना क्रॉस केले असेल तर नॉन स्ट्रायकर एण्डवरील फलंदाज स्ट्राईकवर येत असे. आता मात्र फलंदाजांनी एकमेकांना क्रॉस केले का, ही बाब गौण असेल आणि नवा फलंदाजच स्ट्राईक घेईल.
आणखी एका नव्या बदलानुसार, चेंडू खेळपट्टीबाहेर पडल्यास तो डेडबॉल म्हणून घोषित केला जाईल. एखादा चेंडू मारण्यासाठी फलंदाजाला क्रीझ सोडून बाहेर जावे लागत असेल तर तो नोबॉल दिला जाणार आहे. गोलंदाजाने कोणतीही आक्षेपार्ह कृती केली तर डेडबॉल घोषित केला जाईल आणि त्याचप्रमाणे फलंदाजी संघाला पाच धावा प्रदान केल्या जातील.
गोलंदाजांनी यापुढे चेंडू टाकण्यापूर्वी फलंदाज क्रीझ सोडून बाहेर येत असेल तर त्याला धावचीत करण्यासाठी थ्रो करता येणार नाही. असे केल्यास तो डेडबॉल घोषित केला जाईल. ठरावीक वेळेत ठरावीक षटके पूर्ण न केल्यास 30 यार्डा सर्कलबाहेरील एक क्षेत्ररक्षक कमी करावा लागेल, असा नियम टी-20 मध्ये अंमलात आणला गेला. तोच नियम आता वनडे क्रिकेटमध्येही लागू केला जाणार आहे.
प्लेईंग कंडिशन्समधील महत्त्वाचे नवे बदल
@चेंडूला चकाकी आणण्यासाठी आता सॅलाईव्हा अजिबात लावता येणार नाही.
@एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर नवा फलंदाजच स्ट्राईकवर येईल. यापूर्वी, क्रीझवरील दोन्ही फलंदाजांनी धाव घेताना एकमेकांना क्रॉस केले असेल तर सहकारी फलंदाज पुढील चेंडूवर स्ट्राईक घेत असे. आता मात्र उभयतांनी एकमेकांना क्रॉस केले का, ही बाब गौण असेल. नवा फलंदाजच स्ट्राईक घेईल.
@नॉन स्ट्रायकर एण्डवरील फलंदाज चेंडू टाकला जाण्यापूर्वी क्रीझ सोडून बाहेर जात असेल आणि गोलंदाज त्याला धावचीत करत असेल तर याची गणना अनफेयर प्ले सेक्शनमध्ये केली जात असे. अर्थात, ही बाब खिलाडूवृत्तीच्या विरोधात मानली जात असे. पण, आता त्याचा समावेश रनआऊट सेक्शनमध्ये करण्यात येणार आहे.
@गोलंदाजाकडून चेंडू खेळपट्टीबाहेर पडल्यास तो डेडबॉल म्हणून घोषित केला जाईल.
@एखादा चेंडू मारण्यासाठी फलंदाजाला क्रीझ सोडून बाहेर जावे लागत असेल तर तो नोबॉल दिला जाईल.









