अनेक कामगार अडकले, 3 महिलांनी मारल्या छतावरून उड्या : अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी
वृत्तसंस्था/ शिमला
हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात एका सौंदर्यप्रसाधन (परफ्युम) कारखान्यात भीषण आग लागली. या दुर्घटनेत कारखान्यात 15-20 कामगार अडकले आहेत. आगीनंतरचे व्हिडिओ समोर आले असून त्यामध्ये महिला कामगार छतावर अडकलेली दिसत आहे. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. आग विझवण्यासाठी पंजाब आणि हिमाचलच्या सुमारे 12 अग्निशमन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. तसेच एनडीआरएफचे 50 जणांचे पथक मदत आणि बचावासाठी घटनास्थळी पोहोचले होते.
राज्यातील औद्योगिक शहर असलेल्या बद्दीच्या झाडामाजरी येथे आगीची दुर्घटना घडली. येथील कॉस्मेटिक उत्पादने बनवणाऱ्या कारखान्यात ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आग लागल्यानंतर दोन कामगारांनी छतावरून उडी घेतल्याने ते जायबंदी झाले आहेत.
दुर्घटनासमयी सुमारे साठ मजूर काम करत होते, असे कारखान्यातून सुटका करण्यात आलेल्या एका महिलेने सांगितले. आग लागल्यानंतर तिने खिडकी तोडून उडी मारत स्वत:चा जीव वाचवला. आणखी एका महिलेचीही सुटका करण्यात आली आहे. तिनेही कारखान्यातून उडी मारली. सध्या दोघांनाही ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे.