पंतप्रधान मोदींकडून मुखवा येथे गंगामातेचे पूजन : हिवाळ्यात घाम तापोमध्ये पर्यटनासाठी या
वृत्तसंस्था/उत्तरकाशी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथे पोहोचत गंगामातेचे माहेर म्हणून संबोधिल्या जाणाऱ्या मुखवामध्ये पूजा केली आहे. यानंतर मोदींनी हर्षिल येथे जाहीरसभेला संबोधित केले. यादरम्यान त्यांनी उत्तराखंडमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. तसेच त्यांनी चीनला लागून असलेल्या सीमेनजीकच्या दोन गावांना वसविणे आणि तेथे पर्यटनाला चालना देण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला. 1962 मध्ये चीनच्या हल्ल्यानंतर ही दोन्ही गावं रिकामी करविण्यात आली होती.
1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केल्यावर दोन गावांना रिकामी करविण्यात आले होते. या घटनेला 60-70 वर्षे उलटली, लोक विसरून गेले, परंतु आम्ही विसरू शकत नाही. आम्ही या दोन गावांना पुन्हा वसविण्याचे अभियान राबविले आहे. मोठे पर्यटनस्थळ निर्माण करण्याच्या दिशेने आम्ही पावले टाकत आहोत. उत्तराखंडमध्ये पर्यटकांच्या संख्येत दशकात मोठी वाढ झाल्याचे उद्गार मोदींनी काढले.
आर्थिक मरगळ दूर करण्यासाठी बारमाही पर्यटनावर जोर देत मोदींनी उत्तराखंडमध्ये प्रत्येक सीझन ‘ऑन सीझन’ रहावा असे म्हटले. पर्यटनक्षेत्राला वैविध्यपूर्ण करणे अणि त्याला बारमाही करणे उत्तराखंडसाठी आवश्यक आहे. उत्तराखंडमध्ये पर्यटनाच्या दृष्टीकोनातून कुठलाही सीझन ‘ऑफ सीझन’ ठरू नये अशी माझी इच्छा आहे. सध्या पर्वतीय भागांमध्ये मार्च, एप्रिल आणि जून महिन्यात मोठ्या संख्येत पर्यटक येतात, परंतु त्यानंतर ही संख्या कमी होते. हिवाळ्यात होमस्टे आणि हॉटेल्स रिकामी पडतात, हे असंतुलन उत्तराखंडमध्ये वर्षातील एका मोठ्या हिस्स्याला मंदीचे स्वरुप देते. हिवाळ्यात देशविदेशातून लोक आले तर उत्तराखंडच्या प्रगतीला वेग मिळेल असे मोदींनी म्हटले आहे.
घाम तापो पर्यटन
उत्तराखंडच्या प्रगतीसाठी नवे मार्ग खुले झाले आहेत. घाम तापो पर्यटन उत्तराखंडचा नवा पैलू सर्वांसमोर आणणार आहे. माणा, जादूंग, टिम्मरसैंणमध्ये वेगाने पर्यटन वाढत असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री धामींना सल्ला
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्ससाठी स्पर्धा आयोजित करण्यात यावी असा सल्ला मोदींनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना दिला. उत्तराखंडसाठी विंटर टूरिजमवर शॉर्ट फिल्म तयार करविली जावी. जो सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म तयार करेल, त्याला इनाम देण्यात यावे. यामुळे राज्याच्या सुंदर स्थळांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. तसेच कंटेंट क्रिएटर आणि इन्फ्लुएंसरनी देखील उत्तराखंडच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मोदींनी केले आहे.
डबल इंजिनचे सरकार मिळून करतेय काम
डबल इंजिनचे सरकार उत्तराखंडला विकसित राज्य करण्यासाठी मिळून काम करत आहे. राज्यात चारधाम, ऑल वेदर रोड, आधुनिक एक्स्प्रेसवेपासून रेल्वे अन् हेलिकॉप्टर सेवांचा विस्तार होत आहे. केंद्र सरकारने केदारनाथ आणि हेमकुंडसाहिबसाठी रोपवेला मंजुरी दिली आहे. केदारनाथ रोपवेद्वारे 8-9 तासांचा पायी प्रवास केवळ 30 मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे, यामुळे वृद्ध, महिला अन् मुलांची यात्रा सुलभ होणार असल्याचे मोदी म्हणाले.









