ब्रिटनमधील एका चित्राला शापित समजले जाते. हे चित्र चॅरिटी शॉपवर 20 पाउंडमध्ये विकण्यासाठी ठेवण्यात आले आहे. हे चित्र खरेदी करणारा ग्राहक काही दिवसांनी ते परत करतो. कुणीच हे चित्र स्वत:जवळ बाळगू इच्छित नाही. लोकांनी यामागील कारणही सांगितले आहे. या चित्राकडे पाहिल्यावर चांगला अनुभव येत नाही, अत्यंत विचित्र वाटू लागत असल्याचे ग्राहकांनी तक्रारवजा सूरात सांगितले आहे.
या चित्रात एक छोटी मुलगी लाल रंगाचा ड्रेस परिधान करून असल्याचे दिसून येते. यातील मुलीच्या चेहऱ्यावर त्रासदायक भाव आहेत. हे चित्र इंग्लंडच्या ईस्ट ससेक्सच्या हेस्टिंग्स एडवाइस रिप्रेझेंटेशन सेंटर शॉपला अन्य अनेक चित्रांसोबत देणगीदाखल देण्यात आले होते.
या चित्रातील मुलीचे डोळे पाहून ती तुम्हालाच सर्वप्रकारे पाहत असल्याचे वाटत असल्याने कदाचित हे चित्र कुणीच खरेदी करणार नाही. हे चित्र एका महिलेने 25 पाउंडमध्ये खरेदी केले होते, परंतु दोन दिवसातच तिने हे चित्र परत केले. मला चित्रापासून मुक्तता हवी आहे असे या महिलेने म्हटले होते अशी माहिती दुकानाचे व्यवस्थापक स्टीव्ह यांनी दिली आहे.
स्टीव्ह यांनी हे चित्र पुन्हा दुकानात विक्रीसाठी ठेवले आणि त्यावर ‘संभाव्य स्वरुपात शापित’ असे नमूद पेले. यानंतर हे चित्र अन्य एका महिलेने खरेदी केले, तिनेही चित्र लवकरच परत केले. या शापित गोष्टीला पुन्हा कधीच पाहू इच्छित नसल्याचे या महिलेने सांगितले होते. दुकानाजवळून जाणाऱ्या एका व्यक्तीने हे चित्र पाहिले आणि त्याला कॅमेऱ्यात कैद करत त्यावर ऑनलाइन पोस्ट केली आहे. ही पोस्ट आता व्हायरल झाली आहे. लोक याची तुलना आता 2013 मध्ये प्रदर्शित द कॉन्जरिंगच्या एनाबेल डॉलसोबत करत आहेत. लोकांनी दुकानदाराला हे चित्र जाळण्याचा सल्ला देखील दिला आहे.