मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : पणजी दूरदर्शनचा ’हॅलो गोंयकार’ कार्यक्रम
पणजी : राज्यात एखादी लहानशीसुद्धा गुन्हेगारी घटना घडल्यास त्याचा त्वरित छडा लावण्यात येत आहे. त्यातून लोकांचाही पोलिसांवरील विश्वास वाढू लागला असून यापूर्वी ’नको ती पोलिसांची कटकट’ म्हणून तक्रार करण्यास कचरणारे लोकही आता लहानसहान प्रकरणांच्यासुद्धा तक्रारी करण्यासाठी पुढे येत आहेत. त्यावरून प्रथमदर्शनी राज्यात गुन्हेगारी वाढली असल्यासारखे वाटत असले तरी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर लोकांच्या वाढलेल्या विश्वासाचा हा पुरावा आहे. त्यामुळे बिगरगोमंतकीयांमुळे गोव्यात गोमंतकीय असुरक्षित बनत चालले आहेत, असे म्हणता येणार नाही, असे मत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. पणजी दूरदर्शनवरील हॅलो गोंयकारा या फोन इन कार्यक्रमात जनतेचे प्रश्न, शंका यांचे निरसन करताना ते बोलत होते. अनेक लोक घरात भाडेकरू ठेवतात. त्यांची माहिती पोलिसांना दिली पाहिजे. तसेच प्रत्येकाने आपल्या शेजारी राहणाऱ्या अनोळखी, बिगर गोमंतकीय व्यक्ती-कुटुंबाची माहिती मिळविली पाहिजे. त्यामुळे गुन्हेगारी कमी होण्यात मदत होईल. त्याशिवाय सरकारने आता मजुरांना ’लेबर कार्ड’ देणे सक्तीचे केले आहे. त्यातूनही त्यांची सखोल माहिती सरकारदरबारी नोंद होत असल्याने हे लोक गुन्हे करण्यास धजणार नाहीत. परिणामी गुन्हेगारीचे प्रमाण आपसूक नियंत्रणात येईल व राज्य गुन्हेगारीमुक्त करण्याच्या दृष्टीने चाललेले सरकारचे प्रयत्नही यशस्वी होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
संजीवनीबाबत लवकरच गोड बातमी
धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखाना कोणत्याही परिस्थितीत बंद करणार नाही. सध्या हा कारखाना पीपीपी तत्वावर चालविण्यास देण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत. लवकरच त्यासंबंधी गोड बातमी ऐकायला मिळेल, असे आश्वासन प्रशांत देसाई या ऊस उत्पादक शेतकऱ्यांने विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मडकई एसटीपी प्लांटप्रकरणी तोडगा काढू
मडकई एसटीपी प्लांटला आज विरोध होत असला तरी ती प्रक्रिया बरीच आधी पूर्ण करण्यात आली होती. त्यामुळे ती थांबविता येणार नसली तरी त्यासंदर्भात ग्रामस्थांची मते विचारात घेऊन योग्य तोडगा काढण्यात येईल. मात्र हा प्रकल्प होणे ही काळाची गरज आहे, असे स्वप्नील भांडारी यांच्या संबंधित प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गोव्याच्या क्रीडापटूंसाठी एक मोठी संधी
राष्ट्रीय क्रीडास्पर्धांसाठी साधनसुविधा निर्माण करणे शेवटच्या टप्प्यात असून सप्टेंबरच्या शेवटच्या सप्ताहापर्यंत ते काम पूर्णत्वास येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष आयोजनासंदर्भात निविदा प्रक्रियाही सुरू आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत कंत्राटदारांची सूची तयार होईल. राज्यातील सर्व खेळाडू आणि क्रीडाप्रेमी यांच्यासाठी ही एक मोठी संधी असून तिचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
जी 20 मुळे गोवा पुन्हा जगाच्या नकाशावर
जी20 च्या यशस्वी आयोजनाचा अनुभव सांगताना त्यांनी या कार्यक्रमामुळे राज्यात अनेक साधनसुविधा निर्माण करणे शक्य झाले, त्यात प्रामख्याने पर्यटनाशी संबंधित साधनसुविधांचा समावेश होता. तसेच जगभरातील सुमारे 20 देशांचे लोकप्रतिनिधी, उद्योजक, यांचा भारतासह गोव्यालाही लाभ झाला. त्यामुळे गोवा पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर पोहोचले. त्यातून आता पुन्हा एकदा विदेशी पर्यटक गोव्यात येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
युवक उद्योगांमध्ये काम करण्यास अनुत्सूक
गत 10 वर्षात एकही उद्योग आलेला नाही हे खरे असले तरी स्थानिक युवक अशा उद्योगांमध्ये काम करण्यास इच्छुक नसतात. त्यामुळे शेजारील राज्यांमधून कामगार आणले जातात. आता या सरकारने युवकांना अशा उद्योगांकडे प्रोत्साहित करण्यासाठी अॅप्रेन्टिसशीप कार्यक्रम कार्यवाहित आणला आहे. त्याद्वारे ते प्रशिक्षित होतील व उद्योगांवकडे वळतील. त्यातून राज्यातील बेकारीचे प्रमाण कमी होण्यात मदत होईल, असे सज्जन सावंत यांच्याशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले.
बेकार राहण्यापेक्षा संधीचा फायदा घ्यावा
येत्या ऑक्टोबर महिन्यापासून कोणत्याही सरकारी नोकरीसाठी आयोगातर्फेच निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांना खात्रीने संधी मिळणार आहे. परंतु केवळ सरकारी नोकरीच्या अपेक्षेनेच वाट पाहण्यापेक्षा युवकांनी खाजगी सेक्टरमध्येही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधींचा लाभ घ्यावा. बेकार राहण्यापेक्षा या संधी निश्चित घ्याव्या, असे आवाहन राहूल चोडणकर यांच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी केले. ओबीसी प्रमाणपत्रासाठी विवाहित महिलांना त्यांच्या पालकांचा उत्पन्न दाखला सादर करण्याची अट रद्द करावी, असी मागणी म्हापसा येथील तोरसकर या महिलेने केली होती. त्यावर बोलताना राज्यात समान नागरी कायदा अस्तित्वात असल्यामुळे विवाहानंतर सुद्धा मुलींना पालकांच्या संपत्तीतील हिस्सा मिळण्याची व्यवस्था आहे. म्हणुनच हे प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ’ग्रामीण मित्र’ ही संकल्पना म्हणजे सरकारकडे उपलब्ध असलेल्या विविध 121 सेवा जनतेच्या घरापर्यंत पोहोचविणारे दूत असतील. त्यांचा खास करून ज्येष्ठ नागरिकांना मोठा लाभ होणार आहे. ’सरकार तुमच्या दारी’, ’प्रशासन तुमच्या दारी’ या धर्तीवरच हे ग्रामीण मित्र असतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. शिवनाथ नागेशकर, आगुस्तीन डायस, सेबस्त्याव मास्कारेन्हास मूळ शिरोडा (सध्या युके), दिलीप सगलानी, आदींनीही मुख्यमंत्र्यांना विविध समस्या कथन केल्या. त्यांची समाधानकारक उत्तरे मुख्यमंत्र्यांनी दिली.









