अमेरिकेच्या 450 शहरांमध्ये निदर्शने ः कठोर कायद्याची मागणी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेत बंदूकीद्वारे गोळीबाराच्या घटना अलिकडच्या वर्षांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. 24 मे रोजी टेक्सासच्या एका शाळेत गोळीबार झाला, ज्यात 19 मुले आणि 2 शिक्षकांना जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर लोकांमध्ये तीव्र संताप दिसून येत आहे. वॉशिंग्टन समवेत 450 शहरांमध्ये हजारो लोकांनी निदर्शने केली आहेत.
निदर्शने करत असलेल्या गन सेफ्टी ग्रूप मार्च फॉर अवर लाइव्सच्या सदस्यांनी सरकारला हातावर हात ठेवून बसू देणार नसल्याचे म्हटले आहे. सरकार काहीच करत नसल्याने लोक मरत आहेत. सरकारला आता कठोर पाऊल उचलावेच लागेल. आता कायद्यात बदल करण्याची गरज असल्याचे एका निदर्शकाने म्हटले आहे.
बंदुकीच्या वापरावर आळा का नाही?
अमेरिका 230 वर्षांनंतर देखील स्वतःची बंदूक संस्कृती संपवू शकलेला नाही. अमेरिकेच्या अध्यक्षांपासून तेथील प्रांतांचे प्रमुख या बंदूक संस्कृतीला कायम ठेवण्याच्या बाजूने आहेत. याचबरोबर बंदूक तयार करणाऱया कंपन्या म्हणजेच गन लॉबी देखील या गन कल्चरमागील प्रमुख घटक आहे. 2019 च्या एका अहवालानुसार अमेरिकेत 63 हजार परवानाधारक बंदूक वितरक होते, त्यांनी त्या वर्षात नागरिकांना 83 हजार कोटी रुपयांच्या बंदुका विकल्या होत्या.
बंदूक विकत घेणे अत्यंत सोपे
अमेरिकेत गन कल्चरचा इतिहास सुमारे 230 वर्षे जुना आहे. 1971 मध्ये घटनेच्या दुसऱया दुरुस्ती अंतर्गत अमेरिकेत नागरिकांना शस्त्र बाळगण्याचा आणि खरेदी करण्याचा अधिकार देण्यात आला. हा कायदा अद्याप तेथे लागू आहे. 20118 पासून अमेरिकेत शाळांमध्ये 119 गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. चालू वर्षातच शाळांमध्ये गोळीबाराच्या 27 घटना घडल्या असून यात 140 जणांना जीव गमवावा लागला आहे. 2021 मध्ये गोळीबारात 103 जणांना जीव गमवावा लागला होता.









