जीभ दाखवून करतात अभिवादन
जगात अनेक संस्कृती अन् समाजाचे प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत. या सर्व समुदायांच्या स्वतःच्या प्रथा-परंपरा तसेच जीवन जगण्याची पद्धत देखील आहे. एका संस्कृतीत ज्या गोष्टीला शुभ मानले जात असेल, तीच गोष्ट दुसऱया संस्कृतीत चुकीची मानली जाऊ शकते. आमच्या देशात ज्येष्ठांना भेटल्यावर नमस्कार केला जातो, तर फ्रान्स आणि युक्रेनमध्ये डबल तसेच ट्रिपल किसने त्यांचे स्वागत केले जाते. परंतु एका देशात पाहुण्यांना पाहता लोक उडय़ा मारू लागतात तर अन्य एकदा देशात ज्येष्ठांना जीभ दाखवून अभिवादन केले जाते.
केनियात राहणाऱया मसाई आदिवासी समुदायात पाहुण्यांच्या स्वागत सत्काराची पद्धत वेगळीच आहे. हे लोक पाहुण्यांना पाहताच नाचू लागतात. एक विशेष प्रकारचे अदामु नृत्य पाहुण्यांच्या स्वागतासाठी केले जाते. मजेशीर बाब म्हणजे हे लोकनृत्य करताना लोक उंच उडी घेत असतात.

जीभ दाखवून आदरातिथ्य
भारताचा शेजारी देश तिबेटमध्ये लोक घरी आलेल्या पाहुण्यांना पाहून स्वतःची जीभ बाहेर काढतात. आमच्या देशात जीभ दाखविण्याचा अर्थ एखाद्याला चिडविणे असा होतो. परंतु तिबेटमध्ये हा सन्मानजनक संकेत आहे. तिबेटमध्ये ही अभिवादनाची परपंरा आहे. तेथे लोक पस्परांना भेटल्यावर स्वतःची जीभ दाखवून स्वागत करतात. 9 व्या शतकापासून चालत आलेली परंपरा आजही पाळली जाते. राजा लंगडरमा यांनी या प्रथेला जन्म दिला होता.
पाहुण्यांचा गंध घेण्याची प्रथा
ग्रीनलंडमध्ये पाहुण्यांना भेटतेवेळी परस्परांचे नाक घासले जाते. या प्रथेला कुनिक म्हटले जाते. कुनिक एक औपचारिक अभिवादन आहे. याचबरोबर ते परस्परांचे गाल आणि केसाचे वास घेत असतात. ओशिनियातील तवालूमध्ये पाहुण्यांचे स्वागत करताना त्यांच्या चेहऱयानजीक जात शरीराच्या गंध घेतला जातो आणि याला सोगी म्हटले जाते.









