आमदार असिफ सेठ यांची मनपा अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : सॉफ्टवेअर आणि सर्व्हर समस्या असल्याचे सांगत गेल्या चार-पाच ई-आस्थी नोंदणीचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे तातडीने ही समस्या सोडवून लोकांची कामे करून द्यावीत. विनाकारण लोकांना अधिकाऱ्यांनी त्रास देऊ नये. 15 दिवसांत ई-आस्थींची नोंद न झाल्यास याचे लेखी स्वरुपात उत्तर द्यावे लागेल, अशी सूचना आमदार असिफ सेठ यांनी मनपा आयुक्त महसूल उपायुक्त व झोनल आयुक्तांना केली. गुरुवारी मनपा आयुक्त शुभा बी. यांच्या कक्षात आयोजित महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत आमदार असिफ सेठ यांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. ई-आस्थी प्रणाली अंतर्गत मिळकतींची नोंदणी करून घेऊन मिळकतधारकांना ए व बी खात्याचे वितरण केले जात आहे. मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप केला जात असून मिळकतींची नोंद करण्यासाठी विनाकारण विलंब केला जात आहे.
मिळकतधारकांनी दिलेल्या फायलींमध्ये त्रुटी शोधून विनाकारण नागरिकांना हेलपाटे मारण्यास भाग पाडण्यात येत आहे. त्यामुळे ई-आस्थी नागरिकांसाठी तापदायक ठरली आहे. विभागीय कार्यालयांमध्ये ई-आस्थीसाठी व्यवस्था करण्यात आली असली तरी त्याठिकाणी एजंट सक्रिय झाले आहेत. एजंटांमार्फत दिलेली फाईल तातडीने मंजूर केली जात आहे, असा आरोप आहे. स्वत: मिळकतधारक किंवा नगरसेवक फाईल घेऊन गेल्यास त्यांना प्रतिसाद देण्यात येत नाही.
मनपा आयुक्त शुभा बी. यांनी ई-आस्थीचे काम सोपे व्हावे यासाठी तीन झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांना 2400 चौरस फुटापर्यंतच्या मिळकतींची नोंद करण्याचा अधिकार आहे. 2400 चौरस फुटापेक्षा अधिक मिळकत असल्यास त्याला महसूल उपायुक्तांकडून मंजुरी घ्यावी लागते. बिल कलेक्टर फाईलचा क्रिएटर असून ती फाईल महसूल निरीक्षक व महसूल अधिकारी हे दोघे जण व्हेरीफायर आहेत. झोनल आयुक्तांकडून शेवटची मंजुरी दिली जाते. सध्या अशी प्रक्रिया सुरू असली तरीदेखील नागरिकांना मात्र अनेक दिव्याखालून जावे लागत आहे. अधिकारी हे ना ते कारण सांगून ई-आस्थीची नोंदणी करून घेण्यास विलंब करत आहेत. त्यातच आता गेल्या चार ते पाच दिवसांपासून सॉफ्टवेअर आणि सर्व्हरची समस्या असल्याचे सांगून ई-आस्थीचे काम ठप्प ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ई-आस्थी नोंदणीसाठी गेलेल्या नागरिकांना सर्व्हरचे कारण सांगून माघारी धाडले जात आहे.
याबाबत नागरिकांतून तक्रारी वाढल्या आहेत. ही बाब आमदार असिफ सेठ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गुरुवारी महापालिकेत मनपा आयुक्तांच्या कक्षात महसूल अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ई-आस्थीसाठी अधिकाऱ्यांनी विनाकारण लोकांना त्रास देऊ नये. 15 दिवसांच्या आत फायलींना मंजुरी द्यावी. अन्यथा अधिकाऱ्यांना लेखी उत्तर द्यावे लागेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. बैठकीला मनपा आयुक्त शुभा बी., महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी, प्रशासन उपायुक्त तथा झोनल आयुक्त उदयकुमार तळवार, झोनल आयुक्त संतोष अनिशेट्टर, संतोष बोरगावी उपस्थित होते.









