बिहारमधील जेहानाबाद येथील एका सेतूची ही कहाणी आहे. या सेतूचा इतिहास ब्रिटीशांच्या राजवटीपासूनचा आहे. हा सेतू अत्यंत जुना झाल्याने जर्जर झाला होता. त्यामुळे नंतर त्याचे पुनर्निमाणकार्य करण्यात आले. आता यात आश्चर्य काय, असे वाटण्याची शक्यता आहे तथापि, हे पुनर्निमाणकार्य प्रशासनाकडून करुन घेण्यासाठी लोकांनी ज्या पद्धतीने संघर्ष केला, ती पद्धती अत्यंत स्वारस्यपूर्ण, तितकीच गंभीर आहे. 15 जून 2025 या दिवशी या सेतूच्या पुनर्निमाणकार्याला 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्त या जुन्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. या सेतूसाठीच्या संघर्षाची ही माहिती आहे.
या सेतूचे निर्माणकार्य 100 वर्षांपूर्वी जेहानाबादच्या बिहार शरीफ मार्गावर करण्यात आले होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही अनेक दशके या सेतूचा उपयोग केला जात होता. तथापि, कालांतराने तो जीर्ण झाल्याने मोडकळीला आला. त्याचे पुनर्निमाण करणे आवश्यक होते. तथापि, प्रशासनाने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते. या सेतूची पुनर्बांधणी करण्याच्या ऐवजी प्रशासनाने नागरीकांच्या जाण्यायेण्यासाठी एक डायव्हर्शन काढले होते आणि सेतू वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तथापि, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या डायव्हर्शनच्या माध्यमातून केलेला मार्ग वाहून जात असे. त्यामुळे बिहार शरीफ, नालंदा, काको, एकंगरसराय आदी स्थानांमध्ये राहणाऱ्या लोकांची मोठीच अडचण होत असे. त्यांना पलिकडच्या बाजूला जाणे आणि तेथील लोकांना अलिकडच्या बाजूला येणे अशक्यच होत असे. लोकांना असे करण्यासाठी 20 किलोमीटर लांबीचा फेरा पडत असे. त्यामुळे लोकांचा वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होत असे.
लोकांनी प्रशासनाला वारंवार या सेतूचे पुनर्निर्माण करण्याविषयी आग्रह करुन पाहिला. तथापि, प्रशासनाचे कान आणि डोळे जणू बंद झाले होते. प्रशासनाने लोकांच्या मागणीकडे सरसकट दुर्लक्ष चालविले होते. अशी किमान 3 दशके गेली. हताश आणि निराश झालेल्या एका 50 किलोमीटरच्या पदयात्रे आयोजन केले. या पदयात्रेची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आली होती. तरीही प्रशासनाने कोणतीही हालचार केली नाही. असेच अनेक महिने गेले. अंतिमत: लोकांनी बंद झालेल्या सेतूचे ‘श्राद्ध’ करण्याचे ठरविले. लोकवर्गणीतून हे श्रद्ध केले जाणार होते. सहस्रावधी लोकांनी या श्राद्धात सहभाग घेतला. एखाद्या मृत व्यक्तीचे जसे श्राद्ध केले जाते, तसे या सेतूचेही केले गेले. श्राद्धाचे भोजनही देण्यात आले. या कार्यक्रमाला वृत्तपत्रांमधून प्रचंड प्रसिद्धी मिळाली. तेव्हा कोठे प्रशासनाला जाग आली. त्वरित सेतूच्या पुनर्निर्माणाचे कार्य हाती घेण्यात आले. सात वर्षांपूर्वी हा सेतू पुन्हा बांधण्यात आला आणि लोकांच्या या अद्भूत आंदोलनाची यशस्वी सांगता झाली.









