‘विकसित भारताचा अमृत काल’वर प्रदर्शन
बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील सरकारने किसान सन्मान योजना, आयुष्मान भारत, जलजीवन मिशन यासारख्या दहाहून अधिक योजना सुरू करून त्या समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवल्या आहेत. केंद्र सरकार गेल्या अकरा वर्षांत लोकाभिमुख कार्य करीत आहे. उत्तम प्रशासन देऊन आर्थिकदृष्ट्या दहाव्या स्थानावर असलेला भारत जपानला मागे टाकून चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. पुढील दिवसात भारत आणखी प्रगती साधेल, असा विश्वास खासदार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केला. येथील गोमटेश विद्यापीठात आयोजित विकसित भारताचा अमृत काल यावरील जिल्हास्तरीय सभा आणि प्रदर्शनाचे उद्घाटन करून खासदार शेट्टर बोलत होते. त्यानंतर माजी आमदार संजय पाटील, भाजपचे प्रवक्ते नागराज कुलकर्णी, पक्षनेते एम. बी. जिरली यांनी केंद्रातील भाजप सरकारने गेल्या अकरा वर्षांत केलेल्या यशस्वी कार्याची माहिती दिली. बेळगाव ग्रामीण भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, बेळगाव महानगर भाजप अध्यक्षा गीता सुतार, आमदार विठ्ठल हलगेकर, माजी खासदार मंगला अंगडी, माजी आमदार महांतेश कवटगीमठ, महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, भाजप महिला मोर्चा राज्य सचिव डॉ. सोनाली सरनोबत आदी याप्रसंगी उपस्थित होते.









