माजी मंत्री अलिना साल्ढाणा यांचे आवाहन : फादर बोलमॅक्स प्रकरण
पणजी : गोमंतकीय जनतेमध्ये फूट पाडावी या उद्देशाने फादर बोलमॅक्स यांनी आजवर कधी काही केले नाही व तसे त्यांच्या मनातही नसावे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी काढलेले उद्गार हे चुकीचे होते, असे लक्षात आल्यावर त्यांनी त्वरित माफी मागितलेली आहे, असे निवेदन कऊन माजी मंत्री अलिना साल्ढाणा यांनी गोमंतकीय जनतेने आपला नेहमीचा बंधूभाव राखावा, असे आवाहन केले. साल्ढाणा यांनी एक पत्रक जारी कऊन म्हटले आहे की, आपण मुंबई कुलाबा येथे कार्यक्रमास जाऊन गोव्यात परतल्यानंतर रेव्हरंड फादर बोलमॅक्स यांनी आपल्या धार्मिक उद्बोधनात काढलेल्या उद्गाराबद्दल त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी झाल्याचे वृत्त ऐकीवात आले व धक्काही बसला. दु:खही झाले. फादर बोलमॅक्स हे दर्जेदार शिक्षक आहेत. व्यक्ती या दृष्टिकोनातून फार चांगला माणूस आहे. दुसऱ्यांच्या प्रती प्रेम आहे, आदर आहे, असे निवेदन कऊन फादर बोलमॅक्स यांच्यातील चांगल्या गुणांची देखील कदर केली जावी, अशी मागणी साल्ढाणा यांनी गोमंतकीय जनतेकडे केली आहे. गोव्यातील जनता खूप चांगली आहे, हुशार आहे. एकमेकांशी खूप चांगल्या सहकार्याने राहत असतात. चांगल्या भावनांनी वागत असतात. हिंदू ख्रिस्ती व मुस्लीम यांच्यात चांगले संबंध आहेत. एकमेकांमध्ये असलेला हा बंधूभाव तसेच एकात्मतेचा भाव असाच वृद्धिंगत राहावा. गोवा हे देशात व जगात शांतताप्रिय राज्य आहे. येथील जनता शांतीचे प्रतीक आहे. सर्वांनी शांतता राखावी, असे कळकळीचे आवाहन माजी मंत्री अलिना साल्ढाणा यांनी केले आहे.









