कॉर्नर सभा घेऊन केला प्रचार : परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

बेळगाव : उत्तर मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार अॅड. अमर येळ्ळूरकर यांना सर्व परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. रविवारी सायंकाळी कुडची परिसरात प्रचारफेरी काढण्यात आली. यावेळी कॉर्नर सभा घेऊन मतदारांना संपर्क साधण्यात आला. म. ए. समितीच्या पाठिशी राहून घागर या चिन्हावरील बटण दाबून अमर येळ्ळूरकर यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन करण्यात आले. बसवन कुडची परिसरातील जनता नेहमीच म. ए. समितीच्या पाठीशी असते. महापालिका निवडणुका असो किंवा विधानसभा प्रत्येक वेळी म. ए. समितीच्या उमेदवाराला मतदान केले जाते. यावेळीदेखील म. ए. समितीच्या पाठीशी ठामपणे राहून अमर येळ्ळूरकर यांना निवडून आणावे, असे आवाहन करण्यात आले. बसवन कुडची परिसरातील प्रत्येक घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. सध्या विविध पक्षांचे मतदार मतदान करण्यासाठी भेट घेत आहेत. पण आपली भाषा आणि आपल्या हक्कासाठी आपला हक्काचा माणूस विधानसभेत पाठवणे आवश्यक आहे. आपल्या समस्या मांडून विकासकामे राबविण्यासाठी अमर येळ्ळूरकर यांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन करण्यात आले. प्रचारादरम्यान छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अॅड. अमर येळ्ळूरकर व माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या ठिकाणी कॉर्नर सभा घेण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कुडची गावामध्ये समितीला बळ मिळाल्याचे चित्र दिसत होते. यावेळी बालशिवाजी लाठीमेळा, जय युवक मंडळ, जय शिवाजी युवक मंडळ, सुदर्शन युवक मंडळ, श्री गजानन तरुण युवक मंडळ आदी मंडळांचे कार्यकर्ते, महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी जोतिबा मुतकेकर, किसन कडेमनी, नामदेव जैनोजी, घळगू चौगुले, सुनील मिरजकर, लखन चौगुले, जोतिबा बेडका, राजू चौगुले, नागेश तारिहाळकर, नामदेव मुतकेकर, वामन बेडका यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. मतदारांनी पाठिंबा दर्शवून मतदान करण्याचा निर्धार केला. या प्रचारफेरीत परिसरातील कार्यकर्ते, नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.









