बैठक घेऊन खबरदारी घेण्याचे आवाहन
बेळगाव : गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या चोऱ्या, घरफोड्यांच्या सत्रामुळे आनंदनगर, वडगाव परिसरातील नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. तेथील रहिवासी संघटनेच्या पुढाकारातून स्थानिक नागरिकांची बैठक घेऊन चोऱ्या टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, यासंबंधी चर्चा करण्यात आली. गुरुवारी आनंदनगर येथील शिवमंदिर येथे ही बैठक झाली. आनंदनगर रहिवासी संघटनेचे अध्यक्ष संतोष पवार, किरण कणबरकर आदींसह गल्लीतील प्रमुखांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत धास्तावलेल्या नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. स्वत:ची व स्वत:च्या मालमत्तेची सुरक्षा कशी करायची? याविषयी नागरिकांना सूचना करण्यात आल्या. सध्या उच्छाद मांडणारा गुन्हेगार खास करून पाठीमागील दरवाजा फोडून घरात प्रवेश करतो. एखाद्या घरात शिरण्यापूर्वी आजूबाजूच्या घरांच्या दरवाजांना बाहेरून कड्या लावतो. त्यामुळे नागरिकांनी झोपण्यापूर्वी आपल्या घराचा दरवाजा घट्ट बंद करून घ्यावा. दरवाजाला लागूनच एखादे टेबल ठेवून त्यावर एखादा तांब्या किंवा भांडे ठेवावे. त्यामुळे दरवाजा फोडल्यानंतर त्याचा आवाज कुटुंबीयांना येईल, अशी सूचना करण्यात आली. ज्यांना शक्य आहे, त्यांनी आपल्या घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत. खासकरून दागिन्यांचे उघडपणे प्रदर्शन टाळावे. किमती दागिने लॉकरमध्ये ठेवावेत. गल्लीतील नागरिकांचे गट तयार करून एकमेकांच्या संपर्कात रहावे. घराबाहेरील लाईट रात्रीच्या वेळी सुरू ठेवावेत. आणीबाणीच्या वेळी उपयोगाला येईल, असे लाठ्या, काठ्या जवळ बाळगणे अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
फिरत्या विक्रेत्यांना प्रवेश देऊ नका
आनंदनगर परिसरात फिरत्या विक्रेत्यांना प्रवेश देऊ नये. त्यांच्याकडून कोणतीही वस्तू खरेदी करू नये, अनोळखींचा वावर दिसून आल्यास त्वरित पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा आदी सूचना स्थानिक नागरिकांना देण्यात आल्या. गुन्हेगाराचा मुकाबला करण्यासाठी आता नागरिकही तयार झाले असून चोर-पोलिसांचा खेळ संपविण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी कंबर कसली आहे.









