दबावाच्या राजकारणातही आमचे पेनल बाजी मारणार. धर्मेश सगलानी यांना विश्वास. लवकरच पूर्ण पेनल करणार जाहिर.
डिचोली : साखळी नगरपालिका निवडणुकीसाठी आमच्या गटातील लोकांवर व आमच्या समर्थकांवरही सध्या मोठा राजकीय दबाव आहे. सामान्य नागरिकही ताणावात वावरत आहे. आमच्या पेनलमार्फत निवडणूक लढविण्यास कोणी पुढे येत नसल्याने आपणास यावेळी दोन प्रभागांमध्ये उमेदवारी दाखल करावी लागली आहे. तरीही या निवडणुकीत आम्ही पूर्ण ताकद लावून लढणार आहोत. लोकांच्या विश्वासाच्या बळावर आम्ही या निवडणुकीत याहीवेळी यशस्वी होणार. असा विश्वास माजी नगराध्यक्ष धर्मेश सगलनी यानी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. काही प्रभागांमध्ये रिंगणात उतरण्यासाठी उमेदवारच तयार होत नाही, बाहेरून उमेदवार आयात केल्यास संबंधित प्रभागातील सुचक व अनुमोदक तयार होत नाही, अशी परिस्थिती आहे. निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी सध्या साखळीत सुरू असलेले राजकारण व राजकीय दबाव यापूर्वी कधीच पाहिले नव्हते.
गेल्या निवडणुकीत आमच्या पेनलमधून निवडून आलेले काही नगरसेवक अर्ध्यावरच आम्हाला सोडून भाजपात गेले. तर काही नगरसेवक आता गेले. जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून नाव असलेला पक्ष आज साखळीत आमच्या गटातील उमेदवार पळवत आहेत, हि लाजिरवाणी बाब आहे. त्यासाठीच साखळीत सध्या काही भागांमध्ये नवीन उमेदवार उभे करण्यात आले आहेत. असेही सगलानी यांनी म्हटले. साखळी नगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांनी प्रथमच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. आज मंगळवारी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. साखळी नगरपालिकेत आमच्या टुगेदर फॉर साखळी या पेनलच्या नेत्यांनी सर्व प्रभागांमध्ये आवश्यक असलेली रणनिती आखत उमेदवार उभे केले आहेत. या प्रक्रियेत आपलाही छुपा सहभाग होता. पडद्यामागे राहून काम करताना आपण सर्व गोष्टींवर लक्ष ठेऊन होतो. या नगरपालिका क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव, आमिषे असल्याने रणनिती ठरविताना मोठा गाजावाजा केला नाही. असेही धर्मेश सगलानी पुढे म्हणाले. यावेळी लोक जरी शांत असले तरी गेली दहा वर्षे आम्ही केलेली कामे. साखळीत साकारलेले विविध विकास प्रकल्प, लोकांना दिलेल्या सोयी यावर लोक आमच्या बाजूनेच राहणार. लॉकडाऊन व कोवीड काळात लोकांना घरोघरी दिलेली सेवा लोकांच्या आजही मनात आहे. गेल्या दहा वर्षांत आमच्या गटाने कधीच सुडाचे राजकारण केले नाही. कोणाचे बरे करता येत नसल्यास वाईट कधीच केले नाही. या सर्व बाबी लक्षात ठेऊन या निवडणुकीतही लोक आमच्या बाजूनेच राहतील. असा विश्वास सगलानी यांनी व्यक्त केला.