मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती : रथ मिरवणुकीने झाली उत्सवाची सांगता

डिचोली : विठ्ठलपूर – सांखळी येथील प्रसिद्ध चैत्रोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेला वीरभद्र मोठ्या उत्साहात आणि तितक्याच धार्मिक भावनेने साजरा करण्यात आला. चैत्रोत्सवातील अखेरच्या रात्री दशावतारी नाट्यामंडळीकडून वीरभद्राचा भाग नाटकातून सादर करण्यात आल्यानंतर त्याच मंडपात वीरभद्राचा थरार हजारोंच्या संख्येने उपस्थित लोकांनी अनुभवला. या वीरभद्र सोहळ्यानंतर श्रींची रथातून मिरवणूक काढण्यात आली व या उत्सवाची विधीवतपणे सांगत झाली. वाळवंटी नदीच्या किनारी असलेल्या मंदिरात या वीरभद्राची खास वेशभूषेत रंगविण्यात आल्यानंतर वीरभद्र विठ्ठल रखुमाई मंदिराच्या प्रांगणात दाखल झाला. तेथे त्याच्या पाठीमागे प्रभावळ म्हणजेच तडकी बांधण्यात आली. तत्पूर्वी पुंडलीक मंदिराजवळ गेलेली श्रींची पालखी पुर्ववत मुख्य मंदिराजवळ दाखल झाली. प्रभावळ बांधण्यात आल्यानंतर वीरभद्र मध्यभागी ठेवण्यात आलेल्या बाकड्यावर उभा राहिला. देवाला नमस्कार केल्यानंतर त्याच्या दोन्ही हातांमध्ये धारदार तलवारी देण्यात आल्या.
बाकड्यावरच तलवारी नाचवत वीरभद्राने खास नृत्याला प्रारंभ केला. समोर जमिनीवर करण्यात आलेल्या गवताच्या वर्तुळाला आग लावण्यात आली. वीरभद्राने बाकड्यावरून खाली उडी घेत पेटत्या गवताच्या भोवती पावली मारत नृत्य सादर केले. तेथे ठराविक फ्रेया मारल्यानंतर वीरभद्राने थेट मुख्य मंडपात धाव घेतली. मुख्य मंडपात जमलेल्या मोठ्या संख्येतील लोकांसमोर वीरभद्राने टाळ पखवजाच्या तालावर पावलीचा ठेका धरत पावली मारत या मंडपात नृत्य सादर केले. मध्येच अल्प विश्रांती घेत असताना ‘भुपराज..’ चा गजर सुरूच होता. हातातील धारदार तलवारी वर खाली नाचवत पावली मारून नृत्य करणाऱ्या वीरभद्राचा थरार हजारोंच्या संख्येने उपस्थित लोकांनी अनुभवला. पाच सहा फेऱ्या मारल्यानंतर मध्यभागी पोहोचताच वीरभद्रावर दैवी अवसर संचारला आणि तो बराच आक्रमक झाला. त्याचवेळी प्रसंगावधान राखून त्याला जमिनीवरून वर उचलण्यात आले. त्याच्या तलवारी असलेल्या दोन्ही हातांना घट्ट धरून ताब्यात घेण्यात आल्या. पाठीला बांधण्यात आलेली तडकी (प्रभावळ) तत्काळ सोडविण्यात आली. सर्व झाल्यानंतर वीरभद्राला उचलून मंदिरात नेण्यात आला. तेथे देवाचे तीर्थ देऊन त्याचा दैवी अवसर निवळण्यात आला. हे दृष्य पहायला मंदिरात मोठ्या संख्येने लोकांची गर्दी होती. या वीरभद्र सोहळ्यानंतर श्रींच्या रथाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी देवस्थान समितीचे पदाधिकारी माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे व इतरांची उपस्थिती होती. या रथ मिरवणुकीनंतर या उत्सवाची विधीवतपणे सांगता झाली.









