वर्षभरातील भांडणे निकाली काढण्याची परंपरा
नाताळाचा सण अलिकडेच साजरा झाला आहे, भारतातही मोठय़ा संख्यते लोकांनी हा सण साजरा करत परस्परांना गिफ्ट्स दिल्या आहेत. परंतु नाताळाशी निगडित अशा काही परंपरा आहेत, ज्याबद्दल फारशी माहिती नसते. जगभरात नाताळाचा सण आनंद व्यक्त करून साजरा करण्यात येतो. परंतु पेरूमध्ये वेगळीच परंपरा आहे.
पेरू या देशात नाताळ येताच परस्परांमध्ये भांडणं-झगडणं सुरू केले जाते. सणादिवशी कोण भांडतो असा प्रश्न अनेकांना पडेल, परंतु पेरूच्या चुम्बिविल्कस प्रांतात लोक या दिवशी परस्परांना स्क्वॉश फेकतात आणि लढाई करतात.

पेरूच्या चुम्बिविल्कस प्रांतात नाताळाच्या दिनीच तकनाकुइ नावाचा सण साजरा करतात. यात भांडण-लढाईसह खाणेपिणे, संगीत आणि नृत्य देखील होते. या सणावेळी सर्व लोक वर्षभरापासून मनात ठेवलेला राग बाहेर काढत परस्परांमध्ये लढाई करतात. फायटर्स स्वतःच्या हाताला कापड गुंडाळून परस्परांशी लढाई करतात आणि यादरम्यान एक रेफ्रीही ठेवला जातो.हा रेफ्री रंगीत स्की मास्क परिधान करून कुणालाच मोठी ईजा होऊ नये याची खबरदारी घेत असतो. एखादा व्यक्ती पराभूत झाल्यास ही लढाई संपुष्टात येते.
लढाईनंतर मिळते मद्य
या लढाईचा अंत झाल्यावर दोन्ही फायटर्सना मद्य पाजले जाते. काही लढाई संपत्तीसाठी होतात, तर काही लढाई प्रेमापोटी होत असतात. स्की मास्क व्यतिरिक्त काही ग्रामीण चामडय़ाचे कॅप्सही परिधान करतात. यादरम्यान अनेक कॅरेक्टर कॉस्टय़ूम परिधान केले जातात, ज्यात लोब्स्टर आणि काउबॉय सामील आहे. पूर्वी ही प्रथा केवळ पुरुषांकडून पार पाडली जात होती, परंतु आता महिला देखील यात सामील होऊ लागल्या आहेत. तकनाकुइचा अर्थ रक्त तापणे होतो. या लढाईचा उद्देश पुढील वर्षासाठी स्वतःचे मन पूर्णपणे मोकळे करून घेणे असतो.









