बेळगाव : नाथ पै सर्कल, शहापूर ते येळ्ळूर रस्त्यावर काही जण कचरा फेकून जात होते. या परिसरात कचरा फेकल्यानंतर दंड आकारला जाईल, असा फलक लावण्यात आला आहे. तरीदेखील शुक्रवारी दुचाकीवरून आलेल्या व्यक्तीने त्या ठिकाणी कचरा फेकला. त्यावर नजर ठेवलेल्या नागरिकांनी तातडीने त्याला तो कचरा पुन्हा उचल करण्यास भाग पाडले. या प्रकारामुळे समाधान व्यक्त होत आहे. शहरात काही ठिकाणी अजूनही कचरा फेकण्याचे प्रकार सुरूच आहेत. सध्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी काही युवक मंडळे तसेच परिसरातील नागरिक पुढे आले आहेत.
शहापूर पोलीस स्थानकासमोरच कचऱ्याचा ढीग साचून रहात आहे. तो ब्लॅक स्पॉट हटविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या ठिकाणी कचरा टाकल्यानंतर संबंधिताकडून दंड आकारला जाईल, असा फलक लावण्यात आला आहे. मात्र, काही जण अजूनही त्या ठिकाणी कचरा टाकून जात आहेत. मात्र काही तरुण कचरा फेकणाऱ्यांवर नजर ठेवून आहेत. शुक्रवारी संबंधित दुचाकीस्वाराला चांगलेच धारेवर धरण्यात आले. टाकलेला कचरा पुन्हा त्यांना गोळा करून नेण्यास भाग पाडण्यात आले आहे. या घटनेनंतर या परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.









