हिमाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींची सभा

वृत्तसंस्था / ऊना, चंबा
हिमाचल प्रदेशच्या ऊना आणि चंबा येथील जाहीर सभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या बाजूने वातावरणनिर्मिती केली आहे. वंदे भारत एक्स्प्रेसची सेवा सुरू करण्यासह बल्क ड्रग पार्कच्या कामाचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आला आहे. ऊना येथील सभेत बोलताना मोदींनी हिमाचलमध्ये यापूर्वी सत्तेवर असलेल्या पक्षांमुळेच विकास रखडला होता अशी टीका केली आहे. माझी ‘हायकमांड’ जनताच आहे. जनतेच्या आशीर्वादामुळेच पंतप्रधान पदावर पोहोचलो असून जनतेसाठी काम करत आहे. हिमाचल प्रदेश यावेळी सत्तांतराची प्रथा मोडीत काढत इतिहास रचणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींनी भाषणादरम्यान माजी मुख्यमंत्री शांता कुमार आणि प्रेम कुमार धुमल यांचा उल्लेख केला. दोन्ही नेते चंबा येथील सभेच्या व्यासपीठावर उपस्थित नव्हते. कनेक्टिव्हिटी वाढल्यावर उद्योग स्थापन होण्यास सुरुवात होत राज्यातील तरुण-तरुणींना रोजगारासाठी बाहेर जावे लागणार नाही. आज हिमाचलमध्ये पोहोचलो आहे तो कनेक्टिव्हिटी, उद्योग आणि रोजगार घेऊन आलो आहे. नैसर्गिक वैविध्याने नटलेल्या हिमाचलमध्ये तीनपैकी एक बल्क ड्रग फार्मा पार्क स्थापन होणे मोठी गोष्ट असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
हिमाचल प्रदेशातील लोक रेल्वेसेवेपासून एकेकाळी वंचित राहिले होते, परंतु आता रेल्वेच नव्हे तर भारताची सर्वात आधुनिक रेल्वे पर्वतीय क्षेत्रातील लोकांना मिळाली आहे. वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेमुळे कनेक्टिव्हिटीसोबत पर्वतीय लोकांसाठी रोजगाराची साधनेही उपलब्ध होतील असे मोदींनी नमूद केले आहे. वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वे सुरू झाल्याने शक्तिपीठे आणि अन्य धार्मिक स्थळांची संपर्कव्यवस्था सुगम होणार आहे. चिंतपूर्णी, नयना देवी, ज्वालाजी देवी, कांगडा दवी आणि आनंदपूर साहिबपर्यंत जाणे सोपे ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी चंबामध्ये 180 मेगावॅटच्या बजोली जलविद्युत प्रकल्पाचे लोकार्पण केले आहे. तसेच 48 मेगावॅटच्या चांजूमधील तीन जलविद्युत प्रकल्प तसेच 30.5 मेगावॅटच्या दयोथल चांजू जलविद्युत प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ केला आहे.









