पत्रकार परिषदेत जनसेवा समितीचा आरोप
बेळगाव : राजकीय वातावरण कलुषित झाले आहे. स्वार्थ व कुटुंब राजकारणावर भर दिला जात आहे. राजकीय नेत्यांकडून मोठ्या अपेक्षा ठेवून त्यांना मतदान केलेले मतदार निराश झाले आहेत. भ्रष्टाचारामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे, अशा शब्दात जनसेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खंत व्यक्त केली आहे. शुक्रवारी कन्नड साहित्य भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत समितीच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली असून देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या हक्काचे संरक्षण करण्याबरोबरच संविधानाचे तंतोतंत पालन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सुतगट्टी येथील श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी, महेश तुप्पद, बसवराज हंपन्नावर, निवृत्त न्यायाधीश अशोक पुजारी, पार्वतीदेवी तुप्पद आदी यावेळी उपस्थित होते. व्होटबँकसाठी स्वार्थाचे राजकारण करण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांबद्दलची काळजी मागे पडली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांवरील विश्वास उडत चालला आहे. निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आली नाही. नागरिकांकडून कररुपी जमवण्यात आलेल्या निधीचा दुरुपयोग होत आहे. मतदार भिकारी बनतो आहे तर राजकीय नेते गडगंज संपत्ती जमवत आहेत. घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशातील नागरिक अनाथ बनत चालले आहेत. त्यामुळे राजकीय व्यवस्थेत बदल करण्याची गरजही या नेत्यांनी व्यक्त केली.









