मृतांचे खोटे नातेवाईक होण्याचीही तयारी
जीवनात अशा अनेक गोष्टी असतात, ज्या अत्यंत विचित्र वाटतात, परंतु सत्य असतात. सामान्य परिस्थितीत कुणी दफनभूमी, शवागार किंवा स्मशानभूमीत जाण्याची कुणाची इच्छा असेल? किमान हिंडण्यासाठी तरी कुणी जाऊ इच्छिणार नाही. परंतु एका दफनभूमीत जाण्यासाठी लोक काहीही करण्यास तयार आहेत.
चीनमधील एक फ्यूनरल होम इतके लोकप्रिय ठरले आहे की लोक मृत व्यक्तीचे खोटे नातेवाईक होत तेथे पोहोचत आहेत. चीनच्या गुइजाउ प्रांतातील फ्यूनरल होमध्ये लोक पाहण्यासाठी किंवा फिरण्यासाठी नव्हे तर खाण्यापिण्यासाठी येत आहेत. आता येथील कँटीन काही आदरातिथ्याचे ठिकाण नसल्याने लोकांना येथे येण्याकरता काहीतरी निमित्त काढावे लागते.
स्वादिष्ट खाण्याच्या नादात गर्दी
कॅलीच्या इरलोंग फ्युनरल होममध्ये काही आठवड्यांपासून मोठी गर्दी होत आहे. एका स्थानिक ब्लॉगरच्या व्हिडिओनंतर हा प्रकार सुरू झाला आहे. ब्लॉगरला त्याची आई तेथे घेऊन गेली होती. कारण तेथे अत्यंत चविष्ट नुडल्स मिळतात. अत्यंत दूर असल्याने ब्लॉगर येथे जाऊ इच्छित नव्हता, परंतु एकदा नुडल्स खाल्यावर त्याला स्वत:च्या आईचे म्हणणे पटले. यासंबंधीचा त्याचा व्हिडिओ अत्यंत प्रसिद्ध झाला असून तेथे राइस नुडल्स खाण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. हे लोक कुणाचे नातेवाईक होत तर कुणाच्या अंत्यसंस्कारात सामील होण्याचे निमित्त करत तेथे पोहोचत आहेत.
हे ठिकाण लोकांसाठी खुले करण्यात आलेले नाही. अशा स्थितीत लोकांना केवळ सकाळी 6-8 आणि रात्री 10-10.30 वाजेपर्यंतच नुडल्स मिळू शकतात. आमचे शेफ्स खूपच जबरदस्त असल्याने नुडल्सची मागणी देखील मोठी आहे. याच्या एका सर्व्हिंगचे शुल्क केवळ 122 रुपये आहे आणि हे मांस, स्पाइसी चिकन, मिंस्ड मीट आणि अन्य फ्लेवरमध्ये मिळते असे फ्यूनरल होमच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले. मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळून देखील याला आम्ही व्यवसायाचे स्वरुप देऊ इच्छित नसल्याचे येथील स्टाफचे सांगणे आहे.









